मुंबई : एकीकडे देशात वन्यजीव संरक्षणावर भर दिला जात असताना, दुसरीकडे अंधश्रद्धेमुळे मगरीसारख्या संरक्षित प्राण्याला जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना रत्नागिरीमधील दापोली तालुक्यात घडली. काही दिवसांपूर्वी दापोली तालुक्यातील मौजे गावतळे येथील गावदेवी मंदिराजवळील एका कोरड्या विहिरीत मगर पडली होती.

ग्रामस्थ सुरुवातीला घाबरले होते. परिसरातील स्थानिक सर्पमित्र तुषार महाडिक यांनी मोबाइलवरून वनविभागाला या घटनेची माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. यावेळी दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्र. ग. पाटील, वनरक्षक सुरज जगताप, शुभांगी भिलारे, शुभांगी गुरव, विश्वंभर झाडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, कोरडया विहीरीमध्ये मगर आढळली नाही. दरम्यान, आसपासच्या परिसरात पाहणी केली असता, कोरडया विहिरीपासून ५० मीटर अंतरावर लाकडे पेटत असल्याचे निदर्शनास आले. बारकाईने पाहणी केली असता त्यामध्ये मगर जळत असल्याचे दृष्टीस पडले. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविली आणि मगरीचे अवशेष आग विझवून मगरीचे अवशेष ताब्यात घेतले.

मगरीला मारुन जाळल्याची शक्यता

वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वी काही ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या मगरीवर दगडफेक केली. त्यात मगरीचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत मगरीला विहिरीतून बाहेर काढून जाळल्याचा संशय काही स्थानिकांनी व्यक्त केला. वनविभाग याप्रकरणी पुढील तपास करीत आहे.

या प्रकारामुळे प्राणीप्रेमी आणि वन्यजीव संरक्षण कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मगरीसारखा प्राणी भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार संरक्षित असून त्याला इजा पोहचवणे कायद्याने गुन्हा आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला असून वन्यजीव अधिनियम ,१९७२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मगर आढळल्यास कळवावे…

– जुलै २०२३ मध्ये दापोली रस्त्यावरील जिजामाता भाजी मंडई परिसरात सुमारे ९ फूट लांबीची मगर आढळली होती. वन्यजीव बचाव पथकाने तिला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले होते. दापोली समुद्रकिनाऱ्यावर ऑक्टोबर २०१७ मध्ये एक मगर आढळली होती. एका युवकाने तिला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु मगर पाण्यात परत गेली. दापोली आणि आसपासच्या परिसरात मगरींचे अस्तित्व असल्याचे यावरून स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर, स्थानिक रहिवाशांनी मगर आढळल्यास त्वरित वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांक १९२६ किंवा ७४९९५७५७८९ वर संपर्क साधावा, असे आवाहन परिक्षेत्र वन अधिकारी (दापोली) यांनी केले आहे.