मुंबई : दोन प्रजातींचे ४७ साप आणि ५ कासवांची तस्करी करताना एका इसमाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी शनिवारी अटक केली. स्पायडर टेल्ड हॉर्न्ड वायपर, इंडोनेशियन पिट वायपर, एशियन लीफ टर्टल या प्रजातीच्या वन्यजीवांची तस्करी करण्याच्या उद्देशाने संबंधित व्यक्ती मुंबईत आली होती.

एक व्यक्ती टीजी ३१७ क्रमांकाच्या विमानाने शनिवारी मुंबईत येत होता. मुंबई विमानतळावर येताच सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्याला अडविले. विचारपूस करताना व्यक्ती अस्वस्थ झाली. तसेच, त्याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्यामुळे त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती संबंधित व्यक्तीकडे स्पायडर टेल्ड हॉर्न्ड वायपर प्रजातीचे तीन जिवंत साप आढळून आले. तसेच, एशियन लीफ टर्टल प्रजातीचे पाच कासवही त्याच्या सामानात लपविल्याचे समोर आले. हे दोन्ही जीवजंतू दुर्मीळ असून विशेष कागदपत्रे किंवा परवानगीशिवाय त्यांचा व्यापार करता येत नाही. केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील या जीवजंतुंना कायद्याने संरक्षण देण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिवाय, तपासणी करण्यात आलेल्या व्यक्तीकडे इंडोनेशियन पिट वायपर प्रजातीचे ४४ साप सापडले. त्यातील एक मृतावस्थेत आढळला होता. या प्राण्यांची तस्करी केल्याप्रकरणी व्यक्तीला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी बेड्या ठोकल्या. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी रविवारी पंचनामा करून तस्करी केलेले प्राणी जप्त केले. संबंधित प्रवाशाला सीमाशुल्क कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.