मुंबई : आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रसिध्द करण्याच्या नावाखाली सायबर भामट्यांनी भारतीय सैन्य दलातील एका लेफ्टनंट कर्नलची सव्वा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फिर्यादी लेफ्टनंट कर्नल यांनी गुगलवरून आंतरराष्ट्रीय जर्नलचा शोध घेतला होता. मात्र त्या जर्नलच्या नावाने असलेले संकेतस्थळ बनावट होते. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार ४१ वर्षांचे असून भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत आहेत. ते अंधेरी परिसरात पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. ते सध्या ‘कृत्रिम बुध्दीमत्ता’ (एआय) या विषयावर पीएचडी करीत आहेत. त्यासाठी त्यांनी दोन शोधनिबंध (रिसर्च पेपर्स) तयार केले होते. पीएचडी पदवी मिळविण्यासाठी हे शोधनिबंध आंततराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित करावे लागतात. त्यासाठी ते आंतरराष्ट्रीय जर्नलचा गुगलवर शोध घेत होते. शोध घेत असताना त्यांना एक संकेतस्थळ सापडले. फिर्यादींनी संकेतस्थळावरील सोमपाल नावाच्या व्यक्तीबरोबर संपर्क साधला.
आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित करून देईन, असे आश्वासन सोमपालने दिले. पहिल्या शोधनिबंधासाठी ६९ हजार रुपये, तर दुसऱ्या शोधनिबंधासाठी १ लाख २८ हजार रुपये खर्च येईल, असेही त्याने सांगितले. हे शोध निबंध इंटरनॅशनल ‘जर्नल ऑफ ह्यूमन कम्युटर इंटरॅक्शन’ या जर्नलमध्ये प्रकाशित केले जाईल, असे फिर्यादी यांना सांगण्यात आले.
फिर्यादींनी ३० जुले २०२४ रोजी आरोपी सोमपालने दिलेल्या खात्यावर जीपेद्वारे आगाऊ रक्कम भरली. त्यानंतर त्यांना ई-मेद्वारे शोध निबंध स्वीकारल्याचे प्रमाणपत्र (ॲक्सेपटन्स लेटर) संपादक जेम्स आर लुईस यांच्या नावाने पाठवण्यात आले. ३० नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादींनी दुसरा शोधनिबंध आणि त्याचे पैसे पाठवले. पुढील ३ महिन्यांत हे दोन्ही शोधनिबंध प्रसिध्द होतील, असे त्यांना सांगण्यात आले. या दोन्ही प्रबंधासाठी फिर्यादींनी १ लाख २८ हजार रुपये भरले होेते. मात्र ३ महिने उलटल्यानंतरही शोधनिबंध प्रसिध्द झाले नाहीत. याबाबत फिर्यादी सातत्याने विचारणा करीत होते. परंतु त्यांना वेगवेगळी कारणे देऊन चालढकल केली जात होती.
या दिरंगाईमुळे फिर्यादींना संशय आला. फेब्रुवारी २०२५ रोजी फिर्यादींनी संबंधित जर्नलच्या हेल्पडेस्कची (मदत केंद्र) अन्य ठिकाणाहून माहिती मिळवून चौकशी केली. तेव्हा ते संकेतस्थळ आमचे नसून तुमची फसवणूक झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड), तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६(२), ३३६ (३) आणि ३४० (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.