मुंबई- सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेल्या पीडितांचीच पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याचा एक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी एका भामट्याला अटक केली आहे.
सध्या मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हे होत असून सर्वसामान्य नागरिकांना विविध योजनांचे आमिष दाखवून, दिशाभूल करून सायबर फसवणूक केली जाते. असे पीडित पोलीस ठाण्यात तक्रार देतात. एक भामटा अशा पीडितांची माहिती गोळा करून त्यांचीच पुन्हा आर्थिक फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे. फसवणूकीत गेलेले पैसे काढून देतो त्यासाठी न्यायालयायीन कामकाजाला पैसै लागतील असे सांगून तो पैसे लुबाडात होता.
काय घडायचे ?
याबाबत माहिती देताना पश्चिम सायबर विभागाच्या पोलिसांनी सांगितले, आरोपी अनिल दरेकर (३५) हा रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे राहतो. ज्या लोकांनी सायबर फसवणुकीबाबत तक्रारी केलेल्या आहेत त्यांची तो माहिती मिळवत असे. त्यांच्याशी संपर्क साधून मी १४ सी आणि १९३० या सायबर पोलिसांच्या मदत कक्षातून बोलत असल्याचे सांगत असे. त्यांचा विश्वास बसावा म्हणून अनिल दरेकर, सायबर लिगल ॲण्ड टेक्निकल लिहिलेले आणि भारतीय राजमुद्रा असलेले ओळखपत्र त्यांना पाठवायचा. संबंधित व्यक्तीने जी तक्रार दिली आहे त्याबद्दल माहिती द्यायचा. त्यामुळे पीडितांना त्याच्यावर संशय येत नव्हता. मग तो या गुन्ह्यात गेलेले लाखो रुपये परत मिळवून देतो असे आश्वासन द्यायचा. त्यासाठी न्यायालयीन कामकाज, वकील शुल्क तसेच अन्य कारणांसाठी पैसे लागतील असे सांगायचा. अनेकांना त्याने अशा भूलथापा देऊन पैसे उकळले होते, असे पोलिसांनी सांगितले.
संशय आला … आणि
फसवणूकीची ही नवीच पद्धत असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुळात ज्यांचे लाखो रुपये गेलेले असतात त्यांचा पोलिसांवरच विश्वास असतो. पोलीस आपले पैसे मिळवून देतील अशी आशा असते. नेमका त्याचाच आरोपी फायदा घेत होता. अंधेरी येथील एक तक्रारदार विजयकुमार श्रीवास्तव यांच्याशी आरोपी अनिल दरेकर याने संपर्क साधून सायबर गुन्ह्यातील रक्कम परत मिळवून देतो असे सांगितले होते. त्यासाठी त्याने गुगल पे वर पैसे पाठवायला सांगितले. मात्र श्रीवास्तव यांना संशय आला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन शहानिशा केली. तेव्हा असा कसलाच प्रकार नसल्याचे समजले. पोलिसांनी मग इतर तक्रारदारांशी संपर्क साधला. यातील अनेकांकडून आरोपी दरेकर याने अशाप्रकारे पैसे घेतल्याचे आढळले. पोलिसांनी तपास करून त्याला पनवेल येथून अटक केली. आरोपी दरेकर विरोधात पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात कलम ३१८ (४), ३१९ (२), ३३६ (२), ३३६ (३), ३३८, ३४० (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क) आणि ६६ (ड) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.
पोलिसांचे आवाहन
१४ सी आणि १९३० या मदतवाहिनी कक्षाकडून अशा प्रकारे माहिती घेतली जात नाही तसेच प्रकारच्या कुठल्याही कामासाठी पैसे घेतले जात नाहीत, असे सायबर पोलिसांनी सांगितले. त्यामुळे कुणी जर सायबर किंवा पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून पैशांची मागणी केल्यास सायबर हेल्पलाईनाला किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.