मुंबई : दररोज पहाटे नाशिकहून रेल्वेने निघालेल्या काही महिला हातात भाताच्या लोंबी आणि सोनालूच्या फुलांच्या जुड्या घेऊन दसऱ्यानिमित्त दादर फुलबाजारात दाखल होत आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत बाजारात त्या फुलांची विक्री करतात आणि सायंकाळी परत नाशिकच्या गाडीत बसतात. हा दिनक्रम मागील तीन चार दिवसांपासून सुरू असून बुधवारी विक्रीचा शेवटचा दिवस असणार आहे.
या महिलांच्या हातातील सोनालूची पिवळी फुले आणि भाताच्या लोंबींनी दादर फुलबाजाराचा बहरात भर पडत आहे. भाताच्या लोंबी आणि सोनालूची फुले दहा रुपयांना एक जुडी या दराने उपलब्ध आहे. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्याने त्यांचा रोजचा खर्च भागतो. मात्र, सततचा प्रवास, रेल्वेचा त्रास आणि बाजारातील स्पर्धा या सगळ्यांत त्यांना दररोज झगडावे लागते. दरम्यान, दादर फुलबाजारात दररोज हजारो विक्रेते येतात. अशा गर्दीत स्वत:चा माल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तरीही नाशिकच्या या महिलांनी गेल्या काही दिवसांत आपला जम बसवला आहे.
या महिला साधारण पहाटे ३ – ४ वाजता इगतपूरी येथे रेल्वेत बसतात. हातात गोण्या, बांधलेल्या फुलांच्या जुड्या घेऊन त्या गर्दीतून प्रवास करतात. दादरला पोहोचल्यावर फुलबाजारातील जागा मिळवणे हेच त्यांच्यासाठी पहिले आव्हान असते. बाजारात रोज हजारो विक्रीते असतात, त्यामुळे जागा निश्चित नसते. जिथे कोपरा मिळेल तेथे त्या उभे राहून सोनालूची फुले आणि भाताच्या लोंब्यांची विक्री सुरू करतात.
विक्रीचा संघर्षसाधारण १० रुपयांना फुलांची एक जुडी विकली जाते. ग्राहक भाव करतात, कधी काही ग्राहक दुर्लक्ष करतात, तर कधी जास्त माल मागतात. मोठ्या घाऊक विक्रेत्यांच्या तुलनेत छोट्या विक्रेत्यांमध्ये स्पर्धा कमी असते.
घरगुती पार्श्वभूमी
या महिलांपैकी बहुतेकांची शेती आहे. भाताच्या लोंब्या आणि सोनालूची फुले शेतातून किंवा स्थानिक शेतकऱ्यांकडून घेऊन त्या विक्रीसाठी घेऊन येतात. उदरनिर्वाहासाठी, मुलांचे शिक्षण, घरखर्च भागवण्यासाठी हा प्रवास त्यांना करावा लागतो.
बाजारातील अनिश्चितता
दादर फुलबाजारात दररोज फुलांचे भाव बदलतात. झेंडू, गुलाब, शेवंती, अशा हंगामी फुलांच्या तुलनेत भाताच्या लोंब्या आणि सोनालूची मागणी मर्यादित आहे. त्यामुळे त्यांचा माल लगेच विकला जाईल याची खात्री नसते. बाजारात उशिरा पोहोचल्यास ग्राहक इतर विक्रेत्यांकडून फुलांची खरेदी करतील अशी धाकधूक मनात असते. त्यामुळे बाजारात वेळेवर पोहोचण्यासाठी या महिलांची कसरत सुरू असते.
दहा रुपयांच्या जुड्या विकून दिवस
अखेरीस फार मोठा नफा मिळत नाही. प्रवासखर्च, बाजारातील छोट्या-मोठ्या खर्चानंतर थोडेच पैसा उरतात. तरीही मुंबईत विक्री केल्याशिवाय पर्याय नाही, कारण गावातील बाजारपेठेत एवढा प्रतिसाद मिळत नाही. – दुर्गा पारधी, विक्रेते