मुंबईः शासनाने सर्व कबुतरखाने बंद करण्याचे दिलेले आदेश आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली कारवाई याला विरोध सुरू आहे. बुधवारी दादरमध्ये जैन समाजाने कबुतरखान्यातील ताडपत्री काढून कबुतरांना खाद्य घातले. कबुतरखाना परिसरात मोर्चा काढण्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही हुल्लडबाजी केल्याचा आरोप आहे.
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्यामुळे पोलिसांनी आंंदोलनाला परवानगी नाकारली. त्यानंतर विनापरवानगी आंदोलन केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. परंतु बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मोठ्या संख्येने कबुतरखाना परिसरात आंदोलक जमले. दोनशे ते तीनशे जणांनी घोषणाबाजी करत कबुतरखान्याच्या ताडपत्री काढून तेथे कबुतरांना खाद्य घातले. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जमाव असल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला. या वेळी आंदोलकांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलिसांनी त्यांना अडवून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरीही आंदोलकांनी आत शिरून कबुतरांसाठीचे खाद्य तिथे पसरवले.
नेमके काय घडले?
सकाळी १० च्या सुमारास अनेक नागरिक हे जैन मंदिरात प्रार्थनेसाठी आले होते. त्यातील काही महिला कबुतरखान्याजवळ खाद्य टाकण्यासाठी आल्या असता पोलिसांनी त्यांना मनाई केली. त्यामुळे महिला आक्रमक झाल्या. त्यानंतर हा जमाव थेट कबुतरखान्याच्या दिशेने गेला. त्यानंतर महापालिकेने कबुतरखान्यावर टाकलेली ताडपत्री फाडून टाकण्याचा प्रयत्न केला. महिला या कबुतरांचे खाद्य घेऊन थेट कबुतरखान्यात उतरल्या. तसेच बांबूचे अडथळेही काढून टाकले.
पोलिसांकडून न्यायालयात माहिती
पोलिसांनी या प्रकरणात जमावबंदी, बेकायदा आंदोलन झाल्याबाबतही नोंद केली. याबाबत पोलीस मुंबई महापालिकेच्या भूमिकेच्या प्रतीक्षेत आहेत. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्यामुळे पोलीस याबाबतची संपूर्ण माहिती न्यायालयाला देणार आहेत.
झालेले आंदोलन चुकीचे – लोढा
दादर कबुतरखाना येथे बाहेरच्या नागरिकांनी येऊन आंदोलन केले. त्यात तेथील मंदिर विश्वस्त निधीचे कोणीही सहभागी झालेले नव्हते, असा दावा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी जे निर्देश दिले होते, त्याने आम्ही समाधानी होतो व आजचे आंदोलन रद्द केले होते. आजच्या आंदोलनात जैन समाज किंवा साधुसंत सहभागी झालेले नव्हते. पण तरीही सकाळी जे आंदोलन झाले, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आज झालेले आंदोलन चुकीचे होते असे स्पष्टीकरण लोढा यांनी दिले. या प्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होणार असून निर्णयाची प्रतीक्षा करण्याचे आवाहन लोढा यांनी केले.