मुंबई / Mumbai Dahi Handi 2025 Celebration : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सवात राजकीय नेत्यांचा सहभाग वाढला आहे. विविध राजकीय पक्षांमधील निवडणुकीसाठी उत्सूक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी परिसरात दहीहंडीचे आयोजन करून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र या दहीहंडी उत्सवाची माहिती गोविंदा पथकांपर्यंत पोहोचलीच नाही. त्यामुळे या मंडळींच्या दहीहंडी उत्सवाकडे सायंकाळ ४ पर्यंत गोविंदा पथकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. गोविंदा पथक फिरकत नसल्याने डीजेची गाणी ऐकत बसण्याशिवाय आयोजकांकडे काहीच पर्याय नव्हता.

महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यावेळी अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी भरघोस रक्कमांचे बक्षीसेही जाहीर केली होती. त्यामध्ये अगदी छोट्या पदाधिकाऱ्यांनीही दहीहंडीचे आयोजन केले होते. मात्र नामांकित दहीहंडी आयोजक सोडले तर नवीन आयोजकांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाकडे सायंकाळी ४ पर्यंत गोविंदा पथके फिरकली नसल्याचे निदर्शनास आले.

यंदा या उत्सवात आयोजकांची संख्या वाढली असली तरी गोविंदा पथकांनी मात्र त्याकडे पाठ फिरविली होती. त्या मुसळधार पावसाची भर पडली होती. अनेक उत्सवस्थळी ठिकाणी पाणी साचले होते.