मुंबई : मीरा-भाईंदरच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोलनाक्यामुळे होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन हा नाका दोन किलोमीटर पुढे वर्सोवा पुलासमोरील नर्सरीजवळ स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी दिली. टोलनाका हलविण्याचे काम दिवाळीपूर्वी केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या बैठकीत दहिसर टोल नाक्याबाबत निर्णय घेण्यात आला. या टोल नाक्यामुळे मीरा – भाईंदर शहरातील स्थानिक नागरिक, वाहनचालक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. हे लक्षात घेऊन वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी टोलनाका हलवण्याचा निर्णय झाला. यामुळे मीरा-भाईंदर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने याबाबतचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवला. तो प्रस्ताव केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर टोलनाका स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होईल. यासाठी एक ते दीड महिन्याचा वेळ लागेल, असे सरनाईक म्हणाले. या बैठकीला स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सुहास चिटणीस, वसई- विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त निकेत कौशिक, आयआरबीचे वीरेंद्र म्हैसकर आदी उपस्थित होते.
वर्सोवा पुलाजवळ टोलनाका स्थलांतरित करण्यात आल्याने घोडबंदर मार्गावर ये-जा करणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त केली जाते.