संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर शंभरीपार; शिधापत्रिकेवरील पुरवठा आटला

राज्यातील भीषण दुष्काळात आता महागाईची भर पडली आहे. डाळींचे भाव दिवसागणिक कडाडत चालले असून, येत्या काही दिवसांत तर डाळींच्या महागाईचा उच्चांक गाठण्याची भीती व्यापारी वर्गाकडूनच व्यक्त करण्यात येत आहे.

शिधावाटप दुकानांमध्येही डाळींची टंचाई असल्यामुळे तूरडाळ आणि चणाडाळीपैकी एकच डाळ देण्याचा निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. त्यातही केवळ एकच किलो डाळ देण्यात येत असल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

किरकोळ दुकानांत डाळीने शंभरी पार केली असून आजच्या दिवशी किरकोळ दुकानांमध्ये तूरडाळ १०० ते १३० रुपये किलो दराने विकली जात आहे. मूगडाळही शंभरीच्या उंबरठय़ावर पोहोचली असून उडीद डाळीने १२० रुपयांचा भाव गाठला आहे. डाळींच्या वाढत्या भावामुळे कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडून पडणार आहे.

राज्यावरील दुष्काळाचे भीषण सावट, पाण्याची टंचाई आणि त्यात भर म्हणून रोजच्या भाजीपाल्यापासून जीवनावश्यक वस्तूंची महागाई अशा तिहेरी संकटात सामान्य ग्राहक भरडला जात आहे. गेल्या दोन महिन्यांत सर्व प्रकारच्या डाळींच्या भावात ३० ते ५० रुपयांनी वाढ झाली असून आगामी काळात मागणी आणि पुरवठा यांचे व्यस्त प्रमाण लक्षात घेऊन भाव आणखी वाढतील असे ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ग्रेन मार्केट’चे शरद मारू यांनी सांगितले. दुष्काळामुळे यंदा पेरणीही कमी झाली आणि बाजारातील आवक घटल्यामुळे हा भाववाढीचा फटका बसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.  महाराष्ट्रात सामान्यपणे तूरडाळीच्या

लागवडीखालील क्षेत्र १४३५ हजार हेक्टर एवढे आहे, तर मूगडाळीचे क्षेत्र ४५३ हजार हेक्टर व उडीद डाळीचे क्षेत्र ४८४ हजार हेक्टर एवढे असते. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही लागवड कमी झाल्याचे कृषी विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्र सरकारकडूनही राज्याला पुरेसा धान्यसाठा झाला नसल्याचा मोठा फटका सार्वजनिक धान्य वितरण व्यवस्थेला बसला असून अनेक शिधावाटप केंद्रांवर डाळीच उपलब्ध नसल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.

राज्यात अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांची संख्या एक कोटी ६२ लाख एवढी असून त्या तुलनेत केंद्राकडून निम्मेही धान्य उपलब्ध होत नसल्याचे अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील सूत्रांनी सांगितले. एकीकडे किरकोळ दुकानांमध्ये डाळींचे भाव वाढत चालल्यामुळे सामान्यांचे महिन्याचे आर्थिक नियोजन कोलमडू लागले आहे, तर दुसरीकडे शिधावाटक केंद्रांवरही डाळींची टंचाई तीव्र आहे.

दुष्काळाचा फटका अन्नधान्य उत्पादन क्षेत्राला बसला असून यातूनच डाळींची चणचण भासत आहे. मात्र केंद्राकडे आम्ही ५५ हजार मेट्रिक टन डाळीची मागणी केली असून लवकरच ती उपलब्ध होईल. याशिवाय परदेशातूनही डाळ आयात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असून कोणत्याही परिस्थितीत डाळींचे भाव आटोक्यात ठेवले जातील.

– गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठामंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dal inflation ration card
First published on: 05-06-2019 at 01:55 IST