मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कुटुंबीय आणि समर्थकांसमवेत गुवाहाटीमधील कामाख्या देवीचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत असे साकडे शिंदे यांनी यावेळी देवीला घातले. तर शिंदे गटाच्या आमदारांच्या गुवाहाटी दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चार महिन्यांपूर्वी शिवसेनेला खिंडार पाडून महाविकास आघाडी सरकार पाडताना शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह आसामधील गुवाहाटीला तळ ठोकला होता. शिंदे यांच्या स्वागतासाठी आसाम सरकारने जय्यत तयारी केली होती. विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच भाजप सरकारचे तीन मंत्री तसेच अधिकारी, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. शिंदे यांनी नंतर कामाख्या देवीचे दर्शन घेतले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांच्या विनंतीनुसार आम्ही आलो असून त्यांच्या स्वागताने भारावून गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. कामाख्या देवीचे आशीर्वादाने आसाम आणि महाराष्ट्रात वेगळे नाते निर्माण झाले असून आसाममधील जनतेला आनंद, सुख आणि समृद्धी मिळाली आहे, तशीत राज्यातील जनतेवरील सर्व संकटे दूर व्हावीत असे शिंदे यांनी कामाख्या देवीच्या दर्शनानंतर सांगितले. शिंदे यांच्या या दौऱ्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार, पाणीपुरवठामंत्री  गुलाबराव पाटील तसेच काही आमदारही सहभागी झालेले नाहीत. मात्र या सर्वानी आपली परवानगी घेतली असून निवडणुका व अन्य काही कारणांमुळे ते आलेले नसल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले. विरोधकांना आता काहीच काम उरले नसल्यामुळे ते या दौऱ्यावर टीका करीत असून आम्ही मात्र लोकांची कामे करीत आहोत असा टोलाही त्यांनी लगावला.

 विरोधकांची टीका

ही तर जनतेच्या पैशावर केलेली उधळपट्टी आहे. हे सरकार लवकरच गडगडणार आहे, अशी टीका  राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने केली आहे. या सरकारने राज्यातील कोणत्याही घटकाला बळ दिले नाही.शिवाय राज्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी राज्यातील उद्योग प्रकल्प बाहेरील राज्यात असताना गप्प बसण्याचे काम केले, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली.  जनतेच्या पैशांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी मंत्री, आमदार यांचे गुवाहटी पर्यटन झाले आहे. राज्यातील शेतकरी, बेरोजगार तरुण त्रस्त असताना शिंदे सरकार हे देवदर्शनात व्यस्त आहे. हे सरकार वाचावे म्हणून मुख्यमंत्री शिंदे प्रयत्न करीत आहेत हे दुर्दैव आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Darshan of kamakhya devi by chief minister sufferings people criticism opponents mumbai news ysh
First published on: 27-11-2022 at 00:02 IST