‘चकमक’फेम पोलीस अधिकारी दया नायक यांचे गुन्हेगारी टोळीशी संबंध असल्याचा ठपका ठेवणारा अहवाल महासंचालकांकडे सादर झाल्यानेच त्यांची नागपुरात बदली करण्यात आल्याचे कळते. प्रशासकीय बाब म्हणून कोणाही पोलीस अधिकाऱ्याची राज्यात कुठेही बदली करण्याची प्रथा असली तरी जेव्हा कारवाई होते तेव्हाच मुंबईबाहेर पाठविले जाते.
कांदिवली येथे बिल्डर अजय गोसालिया याच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी अटक झालेल्या आरोपींचा संबंध पोलीस अधिकाऱ्याशी असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु हा पोलीस अधिकारी नेमका कोण होता, हे उघड होत नव्हते. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी सुरू होती. या अहवालातून नायक यांचे नाव उघड झाल्याचे कळते. मात्र त्यास दुजोरा मिळू शकला नाही. याबाबत एक गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांकडे पाठविण्यात आला. हा अहवाल राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आला. त्यानंतरच नायक यांच्या बदलीचे आदेश निघाल्याचे सूत्रांनी सांगितले.
मंगळुरू येथे आईच्या नावे एक कोटींची शाळा उभारणारे दया नायक चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंतांशी असलेल्या संबंधामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. उंची कंपडे आणि कमरेला रिव्हॉल्व्हर लावून फिरणारे नायक यांच्यावर चित्रपटही निघाला होता. अनेक अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी तसेच काही मंत्र्यांशी असलेल्या संबंधामुळेच त्यांच्यावर कारवाई होत नव्हती, अशीही चर्चा होती.
बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. मात्र त्यात फारसे काही निष्पन्न झाले नाही. अलीकडे ते पोलीस दलात रुजू झाले होते. अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या विशेष पथकात त्यांचा समावेश होता. मात्र त्याचवेळी त्यांच्याविरुद्ध गोपनीय चौकशी सुरू होती, असे सूत्रांनी सांगितले.