मुंबई: वैद्यकीय अहवालासह ‘सीसीटीव्ही’ चित्रणाचा आधार घेऊन दहिसर येथील भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याची स्वतंत्र चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. आमदार सदा सरवणकर हे बंदूक गाडीत विसरले होते. त्या बंदुकीतून गोळी झाडणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू असून त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. दादरमध्ये २०२२ मध्ये गणेशोत्सव काळात परवानाधारक बंदूकीमधून गोळी झाडल्याचा न्यायवैद्यक अहवाल येऊनही कारवाई न झालेले शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याबद्दल गृहमंत्री म्हणाले, सरवणकर हे गाडीत रिव्हॉल्व्हर विसरले होते. त्यावेळी गोळीबाराची घटना घडली. तरीही सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान यांच्यासह ११जणांना नोटीस बजावली आहे. त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मुंबईत सहा ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले जात असल्याचे त्यांनी सांगितले.