मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक लढविणार नसून महाराष्ट्रातील राजकारणातच राहणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला. तसेच पुढील १० वर्षांनंतरही आपण भाजपमध्ये असू व पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> नागरी सहकारी बँकांना दिलासा; गुंतवणुकीवरील व्याज करमुक्त : मद्रास उच्च न्यायालयाचा निर्वाळा

सध्या अन्य राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये फडणवीस त्या राज्यांतील प्रचारात सहभागी होत असल्याने त्यामुळे ते राष्ट्रीय राजकारणात जबाबदारी पार पाडू लागल्याची चर्चा रंगली होती. फडणवीस आगामी काळात दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होतील आणि उत्तर मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढतील, असेही बोलले जाऊ लागले होते. मात्र गुरूवारी पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी ही शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली. त्याच वेळी ‘राजकारणात १० दिवसांनी काय होईल, हे माहिती नसते. मात्र पुढील १० वर्षांनंतरही मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून काम करीत असेन आणि पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन’, असे फडणवीस यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. राज्यातील राजकारणात खूपच कटुता आली असून निवडणुकांच्या काळात ती वाढतच जाते. पण लोकसभा निवडणुकीनंतर ती कमी होईल, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> जरांगे-पाटील यांच्या साताऱ्यातील सभेस विरोध; सरसकट कुणबीकरण नको, मराठा आंदोलकांची भूमिका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप कधीही तयार असून यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने निवडणुका स्थगित आहेत. त्या भाजपमुळे थांबलेल्या नाहीत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जो निकाल लागला आहे, तोच या निवडणुकांमध्ये लागेल व भाजपला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी पुढील दिवाळी ‘सागर’ बंगल्यावरच साजरी करणार आहे. ‘वर्षां’ शेवटी सागरालाच मिळते. – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री