मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने माजी मुख्यमंत्र्यांच्या आयोजित केलेल्या गौरव सोहळ्याकडे बहुतांश मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे महायुतीचे माजी मुख्यमंत्री व विद्यामान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला गैरहजर राहिल्याने त्याचीच चर्चा अधिक रंगली. याच वेळी ‘२३ नोव्हेंबरच्या त्या ७२ तासांच्या सरकारमध्येच आजच्या महायुतीच्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली गेली’, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने जांबोरी मैदानावर ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारी राज्याच्या आजी व माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या महोत्सवामध्ये होता. या सत्कार सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासह नारायण राणे, अशोक चव्हाण हे तिघे आजी-माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे पाच माजी मुख्यमंत्री या गौरव सोहळ्याला निमंत्रण देवूनही गैरहजर राहिले.

पवार यांची नापसंती

एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रताप सरनाईक यांनी सत्कार स्वीकारला. याबद्दल अजित पवार यांनी नापसंती व्यक्त केली. सोहळ्याचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले. व्यासपीठावर यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, आदिती तटकरे, मुश्ताक अंतुले आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री व्हावेसे वाटते पण योग जुळून आलाच नाही

राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पाच माजी आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री सतिश पाटील व गुलाबराव देवकर यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलिपराव सोनवणे, धुळ्याचे शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार शरद पाटील तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी हाती घड्याळ बांधले.

राज्य विकासात आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा वाटा आहे. राज्याला विकासाच्या असीम संधी आहेत. बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या या सत्काराने प्रेरणा मिळाली.– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री