लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील शौचालयातील कचऱ्यात नवजात बालिका सापडल्यामुळे शुक्रवारी सकाळी रुग्णालयात खळबळ उडाली. अर्भकाला तात्काळ तेथील डॉक्टरांनी तपासले असता तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी शीव पोलिसांनी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत.

सफाई कामगार सरस्वती डोंगरे (३६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील अपघात विभागातील शौचालयात शुक्रवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास डोंगरे या कचरा गोळा करण्यासाठी गेल्या. तेव्हा, कचऱ्याची बादली जड वाटली म्हणून त्यांनी उघडून पाहताच त्यातील काळ्या रंगाच्या पिशवीत अर्भक मिळून आले. त्यांनी, तत्काळ त्याबाबत वरिष्ठांना कळवले.

आणखी वाचा-मुंबई : गटाराचे काम सुरू असताना महानगर गॅस वाहिनीला गळती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांनी तेथे धाव घेऊन वैद्यकीय तपासणी केली. तपासणीनंतर बाळाला मृत घोषित केले. कोणीतरी बाळ नको असल्याने तेथे फेकून दिले असावे. व त्याच, कारणातून बालिकेचा मृत्यू झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. मृत बाळ एका दिवसांचे होते. बालिकेचे पालकत्त्व नाकारून फेकल्याप्रकरणी अनोळखी महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलीस महिलेचा शोध घेत आहेत. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे शीव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले.