सहा महिन्यातच १७ हजार ८८० जणांचा मृत्यू

शैलजा तिवले

मुंबईत करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने मृत झालेल्यांच्या संख्येत सुमारे २०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. करोना काळात कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाण घटले होते. २०२१ मध्ये मात्र हे प्रमाण पुन्हा वाढल्याचे आढळले आहे.

मुंबईत सर्वाधिक म्हणजे सुमारे १२ टक्के मृत्यू हे कर्करोगाने होतात. त्या खालोखाल हद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण सुमारे १० टक्के तर क्षयरोगामुळे सुमारे सहा टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. करोनाची साथ सुरू झाली त्यावर्षी, २०२० मध्ये मात्र कर्करोगासह हृदयविकार, क्षयरोगामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे आढळले होते. २०२१ मध्ये मात्र यात पुन्हा वाढ झाल्याचे आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून निदर्शनास आले आहे.

मुंबईत २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ६०१ होती. २०१९ मध्ये यात घट होऊन ५ हजार ८४९ झाली. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये म्हणजेच २०२० यात आणखी घट होऊन ५ हजार ६३३ मृत्यू नोंदले गेले. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात, जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांच्या काळातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. या काळात १७ हजार ८८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

आगीमुळे १३५ जणांचा मृत्यू

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आगीच्या घटनाही जास्त प्रमाणात घडल्या. यापूर्वी या मृतांची स्वतंत्र नोंद करण्यात येत नव्हती. जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या काळात आगीमुळे १३५ जणांचा मृत्यू झाला आहे. भाजल्याच्या जखमांमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे. २०२० मध्ये ४४ जणांचा मृत्यू भाजल्यामुळे झाला होता. २०२१ च्या सहा महिन्यातच ही संख्या १०८ झाली आहे.

कर्करोगबाधित मृतांच्या संख्येतही वाढ होण्याची शक्यता

करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये २०१९ च्या तुलनेत कर्करोगाच्या मृत्यूमध्ये सुमारे १३ टक्क्यांनी घट झाली होती. २०२० च्या वर्षभरात मुंबईत कर्करोगामुळे ८ हजार ५७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये हे प्रमाण वाढलेली असण्याची शक्यता असून जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या काळातच ६ हजार ८६१ मृतांची नोंद झाली आहे.

करोनाच्या मृतांमध्ये मात्र घट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी नोंदले आहे. २०२० मध्ये करोनामुळे ११ हजार १०५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये जूनपर्यत १० हजार २८९ करोना मृत्यूं ची नोंद झाली.