मुंबई : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक मोनोरेल मार्गिकेवरील दादर पूर्व मोनोरेल स्थानकाचे नाव बदलण्याची मागणी मागील कित्येक वर्षांपासून स्थानिकांकडून करण्यात येत होती. ही मागणी अखेर सात ते आठ वर्षांनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मान्य केली आहे. स्थानिक रहिवाशांच्या मागणीनुसार दादर पूर्व मोनोरेल स्थानकाचे नाव विठ्ठल मंदिर मोनोरेल स्थानक असे करण्यात आले आहे.

एमएमआरडीएकडून चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशा २० किमी लांबीच्या मोनोरेल मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गिकेतील चेंबूर ते वडाळा असा ८.९३ किमीचा पहिला टप्पा ४ फेब्रुवारी २०१४ रोजी वाहतूक सेवेत दाखल झाला, तर वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा ११.२० किमी लांबीचा टप्पा फेब्रुवारी २०१९ मध्ये कार्यान्वित झाला. ही मोनोरेल देशातील पहिली आणि एकमेव मोनोरेल मार्गिका आहे. ही मार्गिका तोट्यात असून मोनोरेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू आहेत. या मोनोरेल मार्गिकेवर १७ स्थानकांचा समावेश आहे. यातील एक स्थानक म्हणजे दादर पूर्व स्थानक.

हेही वाचा – आरेतील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय, उच्च न्यायालयाचे निरीक्षण; तातडीने दुरुस्तीचे आदेश

हेही वाचा – मुंबई : शिवाजी पार्क मैदानातील माती काढणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादर पूर्व मोनोरेल स्थानक प्रती पंढरपूर अशी ओळख असलेल्या वडाळ्यातील श्री विठ्ठल मंदिरालगत आहे. एमएमआरडीएने या स्थानकाला दादर पूर्व मोनोरेल स्थानक असे नाव दिले. याबाबत स्थानिक रहिवासी, लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त करत या स्थानकाचे नाव विठ्ठल मंदिर मोनोरेल स्थानक असे करण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी उपोषण, आंदोलन करण्यात आले. मात्र एमएमआरडीएकडून ही मागणी फेटाळून लावण्यात आली. त्यानंतरही स्थानिक आणि लोकप्रतिनिधी या मागणीवर ठाम राहिले. अखेर एमएमआरडीएला ही मागणी मान्य करावी लागली आहे. प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत दादर पूर्व मोनोरेल स्थानकाचे नाव विठ्ठल मंदिर करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता दादर पूर्व मोनोरेल स्थानक विठ्ठल मंदिर स्थानक म्हणून ओळखले जाणार आहे.