उपाहारगृह व्यावसायिकांचे पंतप्रधानांना पत्र
मुंबई : स्वयंपाकाच्या व्यावसायिक गॅसच्या दरवाढीने हैराण झालेल्या उपाहारगृह व्यावसायिकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे. ‘स्वयंपाकाच्या व्यावसायिक गॅसवरील वस्तू व सेवा कर १८ टक्क्यांवरून पाच टक्के करावा. जेणेकरून व्यवसायाला दिलासा मिळेल, अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे.
उपाहारगृहात जेवण तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक गॅसच्या दरात महिन्याभरात २६६ रुपये, तर वर्षभरात ७६१ रुपयांची दरवाढ झालेली आहे. या दरवाढीमुळे व्यवसायावर गंभीर परिणाम होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. इंधन महागले तर पदार्थाच्या किमती वाढतील, परिणामी ग्राहकांना दरवाढ सहन करावी लागेल. सद्य:स्थितीत ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने असे होणे योग्य नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसच्या दरात कपात करण्याबाबत सकारात्मक विचार करावा, असे आवाहन या व्यावसायिकांनी केले आहे. गॅस दरवाढीबरोबरच डिझेल आणि पेट्रोलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आमच्या व्यवसायात वाहतुकीचा महत्त्वाचा वाटा आहे. एकूणच इंधनामध्ये होणारी दरवाढ पाहता जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढत आहेत. यावरही केंद्र सरकारने विचार करावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पदार्थाच्या दरात वाढ झाली तर मध्यम वर्गाला ते परवडणारे नाही. उपाहारगृहांमध्ये येणाऱ्या या सर्वात मोठय़ा वर्गाने पाठ फिरवली तर मोठे नुकसान होईल. शिवाय अनेक उपाहारगृहांमध्ये आजही कामगारवर्गाला कमी दरात जेवण दिले जाते. खाद्य पदार्थाची गरज लक्षात घेऊन उपाहारगृहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसवर १८ टक्क्यांऐवजी पाच टक्के कर आकारला तर पदार्थाचे दर स्थिर राहतील. त्यामुळे ग्राहकांनाही दिलासा मिळेल.
– शेरी भाटिया, अध्यक्ष, हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया