सध्या मुंबईत डेंग्यु, हिवताप आणि तापाच्या साथीने थैमान घातले असून आतापर्यंत डेंग्युच्या बळींची संख्या १२ वर पोहोचली आहे. मात्र त्यात चार संशयीत डेंग्यु रुग्णांचा समावेश असल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी डेंग्युमुळे ११ जणांना प्राण गमवावे लागले होते. दरम्यान, आतापर्यंत पालिकेने ५०५ जणांविरुद्ध महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल केले असून २३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे.
अपुरे मनुष्यबळ, त्यातच निवडणुकीच्या कामासाठी गेलेले आरोग्य विभागातील कर्मचारी, तसेच धूम्रफवारणी आणि कीटकनाशक फवारणीचे घटलेले प्रमाण आदी कारणांमुळे मुंबईमध्ये डेंग्यु, हिवताप आणि तापाच्या साथीचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अनुक्रमे दोन, एक आणि चार रुग्णांचा डेंग्युमुळे मृत्यू झाला. तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चार संशयीत डेंग्यु रुग्णांसह पाच जणांना प्राण गमवावे लागले. यंदा आतापर्यंत डेंग्युची बाधा झालेल्या ६५९ जणांपैकी १२ रुग्ण दगावले आहेत. गेल्या वर्षी ९२७ रुग्णांना डेंग्यु झाला होता. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू झाला होता. २०१२ मध्ये मोठय़ा प्रमाणावर डेंग्युचा  प्रादुर्भाव झाला होता. पालिकेकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार त्यावेळी  १००८ जणांना डेंग्यु झाला होता आणि ५ जण मृत्युमुखी पडले होते.दरम्यान, पालिकेने डेंग्युविरुद्ध धडक मोहीम सुरू केली आहे. ठिकठिकाणी जलसंचय होणाऱ्या ठिकाणांची तपासणी सुरू केली आहे.