मुंबई: देश जिंकला, महाराष्ट्र जिंकला आता मुंबई महापालिका जिंकून भगव्याची हॅट्ट्रिक करू या, असा निर्धार शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ठाकरे गटाचा अंहकार विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे ठेचला गेला आहे, अशा शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

वरळी येथे शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन मेळावा साजरा झाला. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार उपनेते, जिल्हाप्रमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन वाढीचा आहे. समोरच्या गटातले ८४ पैकी ५० नगरसेवक आपल्याकडे आले आहेत. इतर पक्षातले १५ नगरसेवक शिवसेनेत सामील झाले असून कोणत्याही परिस्थितीत चार महिन्यांनी होणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक आपण जिंकणार आहोत, असा आत्मविश्वास शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकतीत शिवसेनेने १८२ जागा लढवून ६३ जिंकल्या होत्या. २०१९ च्या निवडणुकीमध्ये १२४ जागा लढवून ५६ जिंकल्या. यावेळी आपण ८० जागा लढून ६० जागा जिंकत ८० टक्के विजयाचा दर नोंदवला आहे, असे शिंदे म्हणाले.

हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात टाकतात’

यांच्या सभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचविला जातात. यांच्या सभेमध्ये दहशतवादी येतात. हिंदुत्व विरोधकांच्या ते मांडीला मांडी लावून बसतात. यांनी दहशतवादी याकूब मेमन याची कबर सजवली. पीपल्स फ्रंट या मुस्लिम संघटनेशी ते आरएसएस ची तुलना करतात. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगामध्ये टाकतात. तुमच्या नाकर्तेपणामुळे मुंबईतून मराठी माणूस बाहेर फेकला गेला, असा आरोप शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

ऑपरेशन सिंदूर’बाबतचा गैरसमज दूर

‘आॉपरेशन सिंदूर’ नंतर भारताची बाजू मांडण्यासाठी गेलेल्या खासदारांच्या शिष्टमंडळात समावेश असलेल्या शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा यांची मुलाखत घेण्यात आली. भारतीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यामुळे भारताच्या ऑपरेशन सिंदूर बाबतचा गैरसमज दूर झाल्याचा दावा या दोघा खासदारांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही’

आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू झालेली लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. लाडक्या सुनेचे रक्षण करणारा शिवसैनिक भाऊ, या लोगोचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यापुढे सुनांना छळाल तर याद राखा, शिवसेनेच्या शाखांमध्ये शिवसेनेच्या पद्धतीने न्याय दिला जाईल, शाखा या सुनेचे माहेर आहेत, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.