मुंबई: विविध क्षेत्रातील तब्बल १७ कंपन्यांसोबत तब्बल ३४ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले. यातून तब्बल ३३ हजार रोजगार उपलब्ध होणार असून उद्योगांना जमीन देण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि पूर्णपणे ऑनलाईन असणारे पोर्टल लवकरच सुरु करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली.
या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, सौरऊर्जा, विद्युत गाड्या आणि ट्रॅक, संरक्षण व त्यासंबंधित विविध क्षेत्रांचा समावेश आहे. उत्तर महाराष्ट्र, पुणे, विदर्भ, कोकण अशा सर्वच भागांमध्ये उद्योग उभारणीची संधी उपलब्ध होणार आहे. या सामंजस्य कराराच्या माध्यमातून जवळपास ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येत असून जे करार झालेले आहेत त्यातील पाच कंपन्या उत्तर महाराष्ट्रमध्ये, पाच पुण्यात गुंतवणूक करणार आहेत. तर सहा कंपन्या विदर्भात ११ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहेत. राज्य सरकारच्या उद्योगस्नेही धोरणामुळेच एकीकडे टेरिफ वाॅर सुरू असताना देखील महाराष्ट्राला इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मिळणे हा गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर असलेला विश्वास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात सहज आणि सुरळीत अनुभव मिळावा यासाठी सरकार वचनबद्ध आहे. आम्ही फक्त करार स्वाक्षरीत करून थांबणार नाही, तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर राज्य शासन भागीदार म्हणून सोबत राहील. याबाबत कुठेही अडथळा येणार नाही अशी ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्य सचिव राजेश कुमार, उद्योग सचिव डॉ.पी. अन्बलगन, औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.