मुंबई : भाजप कधीही काचेच्या घरात रहात नाही. प्रदेश कार्यालयासाठी घेतलेली जागा स्वखर्चाने घेतलेली असून आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत आणि महापालिकेचे सर्व नियम पाळण्यात आले आहेत, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांविषयी दिले.
भाजपच्या कार्यालयासाठी जमीन मिळविण्यासाठी फायलीचा प्रवास राफेलच्या वेगाने झाला. अनेक बेकायदेशीर व्यवहार झाले असल्याने पालिकेने ताब्यात घेतलेली जागा भाजपला सहजपणे व वेगाने हस्तांतरीत करण्यात आली, यासह अनेक मुद्दे शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले आहे.
तर महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे कार्यालय असलेली ही इमारत धोकादायक ठरवून रिकामी करून घेवून ही जागा भाजपच्या ताब्यात दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी केला आहे. फडणवीस यांनी भाजप प्रदेश कार्यालयाच्या भूमीपूजन प्रसंगी विरोधकांच्या आक्षेपांवर भाष्य केले. ज्यांना जागा बळकावण्याची सवय आहे, त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नयेत, असे सांगून फडणवीस म्हणाले, काही नतद्रष्ट प्रश्न उपस्थित करतील, याची जाणीव मला ही जागा घेताना होती.
त्यामुळे सरकारी जागा न घेता खासगी जागा घ्यावी. महापालिका व अन्य यंत्रणांच्या सर्व नियमांचे पालन करावे, आवश्यक परवानग्या घ्याव्यात, अशा सूचना मी ही जबाबदारी पार पाडत असलेल्या माजी खासदार मनोज कोटक यांना दिल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकाला जागा घेताना ज्या कायदेशीर बाबींचे पालन करावे लागते, त्या सर्व गोष्टींची पूर्तता करावी. भाजपसाठी कोणतीही सवलत घेवू नये, अशा सूचना मी दिल्या होत्या. त्यामुळे आवश्यक परवानग्या व कायदेशीर बाबींची पूर्तता झाली आहे. कोणत्याही नियमांचा भंग करण्यात आलेला नाही. आम्ही अधिक चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मंजूर असताना त्यापेक्षा कमीच वापरत आहोत.
अपुऱ्या जागेतही अमित शहांकडून काम
अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यावर सर्व राज्यांमध्ये प्रदेश कार्यालये आणि जिल्हा कार्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत अनेक जागा बघितल्या, पण अडचणी येत होत्या व जागा उपलब्ध होत नव्हती. ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कार्यकाळात दादर येथे मुंबई प्रदेश कार्यालय झाले. सध्याच्या प्रदेश कार्यालयाची जागा अपुरी आहे. पण शहा यांनी १५ दिवस या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत मुक्काम ठोकून २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कामकाज केले.
आता नवीन कार्यालयाची उभारणी करण्यात येत असून तेथे कोणताही बडेजाव असणार नाही. पार्किंग सुविधा गरजेहून अधिक असून रस्त्यावर नेते व कार्यकर्त्यांच्या गाड्या उभ्या राहणार नाहीत. मंजूर चटईक्षेत्रापेक्षा कमी वापर करून बांधकाम करीत असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
