उद्योजकांच्या सहकार्य अभियान उद्घाटनाला पंकजा मुंडेंची दांडी, तर उद्योगमंत्र्यांना दूर ठेवले
देशातील ज्येष्ठ उद्योगपती व बडय़ा कंपन्यांच्या सहकार्यातून राज्यातील एक हजार मागासलेल्या खेडय़ांचा कायापालट करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या अभियानाच्या उद्घाटनास ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनीच दांडी मारली. तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मुख्यमंत्र्यांनीच दूर ठेवले. या अभियानासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या न्यासामध्ये ग्रामविकासमंत्री मुंडे तर उद्योगमंत्री देसाई यांचा सहभाग राहणार की नाही, याचा उल्लेखही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात सुप्त संघर्ष असल्याचे या निमित्ताने उघड झाले आहे.
राज्यातील अतिमागास खेडय़ांचा कायापालट हे मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. ग्रामविकास खात्याची ही प्रमुख जबाबदारी असताना आणि एवढा मोठा कार्यक्रम सोडून पंकजा मुंडे या गुरुवारी लातूर दौऱ्यावर होत्या. त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले असूनही त्यांनी दांडी मारून दूर राहणेच पसंत केले. त्यांच्या विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता मात्र हजर होते.
पंकजा मुंडे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी असलेला सुप्त संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. जलसंधारण खाते बदलण्यावरून नाराज झालेल्या मुंडे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सिंगापूर येथील पाणीपरिषदेला हजर राहण्यावरून ‘ट्विटर’च्या माध्यमातून ‘सुसंवाद’ घडला होता. त्यांच्याकडे जलसंधारण खाते असताना ‘जलयुक्त शिवार’ अभियान सुरू करण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती संकल्पना मांडून पुढाकार घेतला, राज्यभरात दौरे केले व सर्व श्रेय त्यांनाच मिळाले. पंकजा मुंडे यांनीही राज्यभर बैठका व दौरे करून या अभियानासाठी कष्ट घेऊनही बरेचसे श्रेय फडणवीस यांनाच मिळाले. आता त्यांच्या ग्रामविकास खात्याचे प्रमुख कार्य असलेल्या आदर्श ग्राम योजनेसाठी किंवा मागास खेडय़ांच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन हे अभियान सुरू केल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी खात्यामध्ये केलेल्या ‘घुसखोरी’मुळे श्रेयवादातून किंवा फारसे महत्त्व न दिल्याने मुंडे यांनी आमंत्रण असतानाही कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवून आपली नाराजी दाखवून दिल्याची चर्चा सुरू आहे. आपण लातूर दौऱ्यावर असल्याने कार्यक्रमास हजर राहता आले नाही, असे पंकजा मुंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
उद्योग विभागाला डावलले
उद्योगजगताच्या सहभागातून हे अभियान असताना आणि या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असताना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूर ठेवले. उद्योग विभागाचे या अभियानात काही काम नाही, या कारणावरून त्यांना निमंत्रित करण्यात आले नसल्याचे समजते. पण खेडय़ांमध्येच रोजगार संधी उपलब्ध करून देणे, उद्योगांकडून निधी व अन्य मदत घेणे, यासाठी उद्योग विभागाचे सहकार्य आवश्यक असते.ही सर्व जबाबदारी मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच पार पाडण्यात येत असल्याने उद्योग विभागाला किंमत देण्यात आली नाही.
अमिताभ ‘गरीब’?
अमिताभ बच्चन यांनी या अभियानाच्या बैठकीस उपस्थित असलेल्या उद्योगपतींकडे कटाक्ष टाकत ‘माझ्याकडे यांच्याइतके पैसे नाहीत,’ असे मिश्कील वक्तव्य केले. माझा आवाज व चेहरा या अभियानासाठी उपलब्ध राहील, असे स्पष्ट करीत अमिताभ यांनी अभियानाचा प्रचार, ब्रँडिंगसाठी सहकार्य करणार असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
काही मंत्र्यांची हजेरी
या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, जलसंधारण मंत्री राम शिंदे, कौशल्यविकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे उपस्थित होते.