मुंबई : माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, संजय राठोड, योगेश कदम हे मंत्री तर आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वर्तनामुळे महायुती सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना फैलावर घेत चूक करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी केवळ समज देत साऱ्यांना सोडून दिले. यातून कोकाटेंसह कोणत्याही मंत्र्याच्या विरोधात कारवाई होणार नाही हे स्पष्ट झाले.
विधान परिषदेत भ्रमणध्वनीवर रमी खेळत असल्याची चित्रफीत समोर आली. यावरून वाद निर्माण झाला असतानाच कोकाटे यांनी ‘सरकार भिकारी’ अशी टीका केली होती. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. या विधानाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कोकाटे यांना चर्चेसाठी पाचारण केले होते. त्या वेळी पवारांनी कोकाटेंची कानउघाडणी केली. आतापर्यंत दोनदा ताकीद दिली. यापुढे वादग्रस्त विधाने वा वर्तन खपवून घेणार नाही, असे अजितदादांनी बजावले. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कार्यक्रमपत्रिकेवरील विषय संपताच अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले व फडणवीस यांनी मंत्र्यांना फैलावर घेतले.
कोकाटे यांची चित्रफीत, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची घरातील नोटांच्या बॅगेची चित्रफीत तसेच मुलाचे हॉटेल खरेदी प्रकरण, डान्सबारवरील कारवाईने गृहराज्यमंत्री योगेश कदम, जलसंधारण खात्यातील बदल्या आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे संजय राठोड हे मंत्री वादग्रस्त ठरले आहेत. आमदार निवासातील उपाहारगृहात कर्मचाऱ्याला मारहाण करून परत त्याचे समर्थन केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका झाली. मंत्री शंभूराज देसाई यांच्यामुळे अधिवेशनात सरकारची कोंडी झाली. या सर्व मंत्र्यांच्या उद्याोगांमुळे महायुती सरकारच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.
तुमच्या या उचापतींमुळे सरकारची बदनामी होते. तुमच्या बेडरूममध्ये चित्रीकरण केले जाते, पण त्याचे तुम्हाला भान नाही. सभागृहात कॅमेरे आहेत. राज्यातील सर्व जनता तुम्हाला थेट पाहते याची मोबाइलवर गेम खेळताना काळजी घ्यायला नको का? कोणतेही वक्तव्य करताना आपण मंत्री आहोत. सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल, समाजात आपली बदनामी होईल याचेही भान ठेवले जात नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. तसेच ही अखेरची संधी, कोणावर काय कारवाई करायची ती करूच, पण आता एकही प्रकार खपवून घेणार नाही. पुन्हा चूक झाली तर क्षमा नाही थेट घरी पाठवू, असा इशाराच मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे समजते.
शयनगृहात चित्रीकरण होते तरी अनभिज्ञ असल्याबद्दल संजय शिरसाट यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कानउघाडणी केली. गृहराज्यमंत्री डान्सबार चालवितात व त्यावर पोलीस कारवाई करतात हे योगेश कदम यांच्यासाठी शोभादायक नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कदम यांची कानउघाडणी केली.
वादग्रस्त मंत्र्यांना अभय
माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट, संजय राठोड वा योगेश कदम या मंत्र्यांवर कारवाई केली जाणार अशी चर्चा सुरू झाली होती. वादग्रस्त मंत्र्यांना नारळ देऊन मंत्रिमंडळाचा विस्तार करणार, असेही बोलले जात होते. पण समज देण्यापलीकडे एकाही मंत्र्याच्या विरोधात काहीही कारवाई केली जाणार नाही. पारदर्शक कारभाराबद्दल फडणवीस कितीही दावे करीत असले तरीही समज देण्यापलीकडे मुख्यमंत्री काहीही कारवाई करू शकत नाहीत हेच स्पष्ट झाले. कोकाटे यांची हकालपट्टी वा खाते बदलल्यास त्याचे सारे श्रेय विरोधकांना जाईल हे लक्षात घेऊन अजित पवारांनीही मवाळ भूमिका घेतली.