मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या चौकशीच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी केलेल्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला दिले.

सतीश सालियन यांची याचिका न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे बुधवारी सुनावणीसाठी आली. त्यावेळी, या प्रकरणी अपघाती मृत्यू नोंद झाली होती. तपासाअंती ते प्रकरण बंद करण्यात आले. तथापि, आता दिशाच्या कुटुंबीयांनीच याचिका केली आहे. त्यामुळे, या सगळ्या बाबी पाहाव्या लागतील. त्यामुळे, या प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ हवा आहे, असे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.

न्यायालयानेही त्यांचे म्हणणे मान्य करून सरकारला सालियन यांच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी वेळ दिला. त्याचवेळी, याचिकाकर्त्यांना तातडीने सुनावणी हवी असल्यास ते उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे दाद मागू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान, दिशा सालियन हिचा ८ जून २०२० रोजी मालाड येथील एका निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर, काही दिवसांनी म्हणजेच १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूत हा वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. सुशांतने आत्महत्या केल्याचे प्रकरण पोलिसांनी सुरुवातीला नोंदवले होते. तथापि, सुशांतने आत्महत्या केलेली नाही, तर त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केल्यावर प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. त्यानंतर, दिशा हिचाही खून करण्यात आला होता आणि शिवसेना (ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. दिशाच्या कुटुंबीयांनी तिचा खून झाल्याचा आरोप त्यावेळी फेटाळले होते. त्यांनी न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्रही दाखल केले होते. परंतु, दिशाचे वडील सतीश यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेऊन दिशाचा खून झाल्याचा दावा केला आहे. तसेच, या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.

याचिकेतील मागणी

या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि इतरांना आरोपी करून अटक करण्याची प्रमुख मागणीही सतीश सालियान यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुराव्यांत फेरबदल केल्याचा आरोप

दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिचा खून करण्यात आला. त्यानंतर, या प्रकरणाशी संबंधित काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रकरण दडपण्यात आल्याचा दावाही सालियन यांनी याचिकेत केला आहे. मुंबई पोलिसांनी न्यायवैद्यक, परिस्थितीजन्य पुरावे आणि प्रत्यक्षदर्शींची साक्ष विचारात न घेता दिशा हिने आत्महत्या केल्याचा किंवा तिचा अपघाती मृत्यू झाल्याचे दाखवले व प्रकरण घाईघाईने बंद केल्याचा आरोप याचिकेत केला आहे.