मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि शांतताभंग होऊ नये यासाठी पोलिसांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन व फ्लाइंग कंदील उडविण्यास आणि विकण्यास बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई शहर व उपनगरात दिवाळीत फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यासह ड्रोन आणि फ्लाइंग कंदील उडविण्याचे प्रकार घडतात. परिणामी, अनेकदा आगीची व मोठा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अनेक नामांकित व्यक्तींना हवाई यंत्रांद्वारे लक्ष्यही केले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायको-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून आदींच्या उड्डाण क्रियांना म्हणजेच आकाशात उडविण्यास ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबरदरम्यानच्या बंदी घालण्यात आली आहे.

यादरम्यान, मुंबई पोलीसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उप आयुक्त (अभियान), बृहन्मुंबई यांच्या लेखी विशिष्ट परवानगीने करण्यात येणारी कारवाई अपवाद राहील.दरम्यान, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत १२ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर २०२५ या ३० दिवसांत फ्लाइंग कंदील उडविण्यास पूर्णतः बंदी असणार आहे. तसेच फ्लाइंग कंदीलचा साठा करण्यास व विक्री करण्यासही परवानगी नाही.