लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गाळ उपसलेल्या आणि तरंगता कचरा काढलेल्या नदी – नाल्यांमध्ये कचरा टाकण्याचे प्रकार वारंवार घडतात. परिणामी, प्रशासनाला वारंवार त्याच ठिकाणी तरंगता कचरा काढण्यासाठी यंत्रणा खर्च करावी लागते. तसेच स्वच्छता केल्यानंतरही नाल्यांत आढळणाऱ्या कचऱ्यामुळे अकारण महानगरपालिकेवर टीका केली जाते. अशा प्रकारचा कचरा आणि मोठ्या आकाराच्या, अवजड वस्तू नदी – नाल्यांमध्ये अडकून मुसळधार पावसाच्या वेळी पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी अशा घटना टाळण्यासाठी गाळ उपसा केलेल्या नदी नाल्यांमध्ये कचरा, तसेच वस्तू टाकू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महानगरपालिकेकडून मुंबईतील लहान मोठे नाले, नद्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना वेग देण्यात आला आहे. ही सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत आणि योग्यप्रकारे पूर्ण करावीत, जिथे गाळ उपशाची कामे पूर्ण झाली असतील तेथील मनुष्यबळ आणि संयंत्रे आवश्यक ठिकाणी न्यावीत, असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी, तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी दौऱ्यादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या कामांची पाहणी करून योग्य ते आदेश देण्याच्या दृष्टीने अश्विनी जोशी यांनी शहर विभागात, तर अभिजीत बांगर यांनी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात सुरू असलेल्या कामांची शनिवारी पाहणी केली. अश्विनी जोशी यांनी एफ दक्षिण विभागातील प्रतीक्षा नगर बस डेपो कंपाऊंड नाला, जे. के. केमिकल नाला, शास्त्रीनगर नाला, डब्ल्यूटीटी नाला येथील गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. त्यानंतर जी उत्तर विभागात शीव रुग्णालय परिसरातील रावळी नाला, दादर धारावी नाला, राजीव गांधी नगर नाला, राजीव गांधी नगर, लूप रोड आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग येथेही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.

आणखी वाचा-रुग्णालयाच्या नावाने मंजूर रक्तपेढी रुग्णालयात नसल्यास होणार परवाना रद्द, केंद्रीय आरोग्य सेवा विभागाचे निर्देश

यावेळी विविध ठिकाणी मलनिःसारण, पर्जन्य जल आदी वाहिन्यांवर मनुष्य प्रवेशिकांच्या (मॅनहोल) जागी बसवलेल्या प्रतिबंधक जाळ्या तसेच झाकणांचीही पाहणी केली. आवश्यक त्या सर्व ठिकाणी मनुष्य प्रवेशिकांवर जाळी आणि झाकणे बसवण्याची कार्यवाही वेगाने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी उप आयुक्त प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले आदी उपस्थित होते.

पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रस्ते कामांनाही वेग

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांसह रस्ते कामांचाही प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. बांगर यांनी पूर्व उपनगरातील पीएमजीपी नाला, देवनार नाला, मिठी नदीचा बक्षीसिंग कंपाऊंड येथील परिसर, पश्चिम उपनगरातील एसएनडीटी नाला लिडो टॉवर, मीलन भूयारी मार्ग, तसेच अंधेरी भूयारी मार्ग येथे जाऊन गाळ काढण्याच्या कामांची पाहणी केली. नाल्यातून गाळ काढण्याचे काम वेगाने करून कुठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात, असे आदेश बांगर यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी उप आयुक्त उल्हास महाले, प्रमुख अभियंता श्रीधर चौधरी, प्रमुख अभियंता विवेक कल्याणकर, प्रमुख अभियंता मनीष पटेल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.