मुंबई : तरुण वयात पचनस्थेच्या आरोग्याचे वेळेत निदान होऊन निरोगी आयुश्य जगता यावे यासाठी गावखेड्यात सुसज्ज गाडीमधून जाऊन रुग्णांची एंडोस्कोपी करण्याचे व्रत डॉक्टरांनी घेतले आहे. महाराष्ट्रातील हे पहिलेच फिरते एंडोस्कोपिक रुग्णालय असून गेल्याच आठवड्यात डॉ नितीन जोशी यांनी शंभराव्या शिबीरात तब्बल ७७ रुग्णांची एंडोस्कोपी केली. एक मिशन घेऊन मराठवाड्यातील जिल्ह्याजिल्ह्यातील गावांमध्ये जाऊन एकीकडे ते व्यसमुक्तीचा प्रचार करतात तर दुसरीकडे तरुणांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पचनसंस्था बळकटीकरणाचे महात्म्य सांगतानाच एंडोस्कोपी करून आरोग्याची तपासणी करतात. हा सारा प्रवास बहुतेकवेळा खिशाला खार लावून केला जातो.
एकीकडे श्रीमंत रुग्णालयांमध्ये डॉक्टर व रुग्णालयांकडून रुग्णांची लुटमार होत असल्याचे तसेच वाट्टेल तशी अनामत रक्कम मागितली जात असल्याचे चित्र दिसत आहे त्याचवेळी ठरवून डॉक्टर नितीन जोशी मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, लातूर, बीड आणि विदर्भातील परभणी येथील गावागावांमध्ये जाऊन तरुणांची एंडोस्कोपीच्या माध्यमातून जवळपास मोफत आरोग्य तपासणी करत आहेत. खरतर डॉ जोशी मुंबतील पंचतारांकित रुग्णालयात उत्तम व्यवसाय करू शकत होते. मुंबईत काहीकाळ त्यांनी वैद्यकीय व्यवसायही केला. मात्र मुळचे मराठवाड्यातील असल्यामुळे २०१५मध्ये नांदेड येथे जाऊन त्यांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.
गॅलेक्सी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची एंडोस्कोपी करत असताना एकदिवस घरातील काही दुर्देवी घटनेमुळे त्यांनी वेगळ्या पद्धतीने रुग्णसेवेचा विचार सुरु केला. याच काळात भारतरत्न अब्दुल कलाम आणि आफ्रिकेचे भाग्यविधाते नेल्सन मंडेला यांची काही पुस्तके त्यांच्या वाचनात आली. यातूनच आपण रुग्णसेवेची दिशा निश्चित केल्याचे डॉ जोशी यांनी सांगितले. रुग्णांच्या दारात जाऊन त्यांच्या खिशाला परवडेल किंवा खुपदा मोफत सेवा देण्याचे व्रत त्यांनी गेल्या चार वर्षापासून चालवले आहे. यासाठी “ एंडोस्कोपी आपल्या दारी” ही संकल्पना तयार करून त्यासाठी २७ आसनक्षमतेची एक गाडी त्यांनी विकत घेतली. या गाडीमध्ये आवश्यक ते बदल करून महत्त्वाची सर्व उपकरणे व रुग्णतपासणीची व्यवस्था तयार करून घेतली. त्यानंतर सुरुवातीला नांदेडमधील माहूर व किनवट या दोन आदिवासी भागात त्यांनी आठवड्यातून एकदा एंडोस्कोपी तपासणी सुरु केली. पाहाता पाहाता मराठवाड्यातील ५१ गावांमध्ये आज नियमितपणे एंडोस्कोपी तपासणी शिबीरे घेतली जात आहेत.
गेल्या आठवड्यात या गॅलक्सी फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाच्या १०० व्या शिबिराचे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी, गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशनचे अध्यक्ष आणि पचनसंस्थाविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॅनमध्ये एंडोस्कोपी करून दाखविली. गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ सुशील राठी, कौस्तुभ कुलकर्णी, जयतीर्थ जोशी ,मंगला जोशी व ॲड. वनिता उर्फ मृणमयी कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. या प्रवासाविषयी डॉ नितीन जोशी म्हणाले, आमच्या फिरत्या रुग्णालयात सहा लोकांची टीम कारते. यात दोन एंडोस्कोपी तंत्रज्ञ, दोन चालक, पॅथॉलॉजीस्ट तसेच मदतनीस असतात. शंभर शिबीरे करताना आमच्या फिरत्या रुग्णालयाने आतापर्यंत २५ हजार किलोमीटरचा प्रवास केला असून आतापर्यंत सहा जिल्ह्यात १२७७ रुग्णांची तपासणी केली आहे.
शंभराव्या शिबीरात गॅलक्सी रुग्णालयाच्या संपूर्ण टीम सोबत फिनिक्स हॉस्पिटल नांदेडचे जेष्ठ फिजीशियन डॉ अनंत सूर्यवंशी आणि डॉ कृष्णा घोडजकर , गॅलक्सी हॉस्पिटलचे डॉ संदीप दरबास्तवार , डॉ रोहित बुलबुले, डॉ स्वप्ना बुलबुले, डॉ सनाउल्ला जवाद यांनी रुग्ण तपासणी केली. या शिबिरासाठी एकूण १२६ रुग्णांनी नाव नोंदणी केली होती त्यापैकी ७७ रुग्णांची एंडोस्कोपी करण्यात आली व मोफत औषधे देण्यात आली. मुंबईतील मोठ्या रुग्णालयात एंडोस्कोपीसाठी १५ ते २५ हजार रुपये खर्च येत असताना आपली सुसज्ज गॅलेक्सी एंडोस्कोपी गाडी घेऊन गाव खेड्यात रुग्णतपासणी करताना रुग्णांकडून कवेळ तीन हजार रुपये आकरण्यात येतात तसेच ज्या रुग्णांकडे तीन हजार रुपये नसतील त्यांचीही मोफत तपासणी केली जाते, असे डॉ जोशी यांनी सांगितले. तरुण वयात पचनसंस्थेच्या गंभीर आजारामुळे व उशीरा निदान झाल्याने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा माझा दृष्टीकोन आहे. तसेच गावोगावी व्यवसमुक्ती शिबीरे घेऊन तरुणांना व्यसनमुक्त करण्याचे कामही डॉ जोशी करतात. हे काम माझ्या एकट्याचे नाही, यासाठी ‘आपले पोट आपल्या हातात’ हे पुस्तक लिहून याच्या चार हजार प्रती गावोगावच्या डॉक्टरांना मोफत वाटल्याचेही त्यांनी सांगितले.
तरुण हे देशाचे भवितव्य असून त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, ही माझी भूमिका आहे. खरेतर चाळीशीनंतर प्रत्येकाची एंडोस्कोपी सक्तीने झाली तर पचनसंस्थेशी संबंधित कर्करोगापासून अनेक आजारांचे निदान लवकर होऊन वेळेत उपचार करणे शक्य होईल. अलीकडेच हैदराबाद तेथील एआयजी या प्रसिद्ध रुग्णालयात जपानमधील एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर एका परिषदेसाठी आले होते. यासाठी देशभरातून २० एंडोस्कोपी तज्ज्ञ उपस्थित होते. या परिषदेत माझ्या फिरत्या एंडोस्कोपी दवाख्यान्याची माहिती मी सादर केली तेव्हा जपानी डॉक्टरांनी सांगितले की, १९८५ ते ८७ या काळात जपानमध्ये फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून एंडोस्कोपी तपासणी केली जात होती. त्यानंतर ती बंद झाली कारण आता वयाच्या ४० नंतर जपानमध्ये प्रत्येकाची एंडोस्कोपी तपासणी सक्तीची केली आहे. आपल्याकडे आरोग्य विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला गेल्यास लाखो तरुणांच्या आजाराचे निदान वेळेत होऊन आरोग्यदायी जीवन जगता येईल असे डॉ जोशी म्हणाले.