मुंबई : होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्यास राज्य सरकारने दिलेल्या परवानगीविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनसोबतच (आयएमए) ‘मार्ड’ने संप पुकारण्याचा इशारा दिला होता. मात्र मुंबईतील जे.जे. रुग्णालय, केईएम, शीव, नायर आणि कूपर रुग्णालयामधील ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी संपाऐवजी काळ्या फिती लावून निषेध केला. यामुळे या रुग्णालयांमधील रुग्णसेवेवर काेणताही परिणाम झाला नाही.

आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीचा सराव करण्याची मुभा राज्य सरकारने दिली. याविरोधात आयएमएने राज्यव्यापी संपाची हाक दिली होती. या संपामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या एमएसआरडीए व निवासी डाॅक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ आणि आंतरवासिता विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या ‘अस्मि’चे डॉक्टर सहभागी झाले होते.

तर फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने (फाईमा) या संपाला पाठिंबा दिला होता. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या केईम, नायर, शीव व कूपर रुग्णालयातील ‘मार्ड’च्या डॉक्टरांनी प्रत्यक्ष संपामध्ये सहभागी न होता काळ्या फिती लावून काम केले. तसेच बाह्यरुग्ण विभागामध्येही निवासी डॉक्टरांनी उपस्थित राहून सेवा दिली. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधील रुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही.

संपादरम्यान जे .जे. रुग्णालयामधील सेवा बाधित होऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासनाने प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व आंतरवासिता करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बाह्यरुग्ण विभागातील रुग्ण सेवा सुरू ठेवली. मात्र निवासी डॉक्टरांची संख्या कमी असल्याने बाह्य रुग्ण विभागामध्ये काही प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. जे. जे. रुग्णालयामध्ये गुरूवारी बाह्यरुग्ण विभागामध्ये २०१० रुग्ण उपचारासाठी आले.

अपघात विभागामध्ये ११३ जणांवर उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे रुग्णालयातील अत्यावश्यक शस्त्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडल्या असल्या तरी लहान स्वरुपाच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे गुरूवारी जे.जे. रुग्णालयामध्ये फक्त १५ लघु शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी दिली.

संप करण्याची आमची इच्छा नाही, परंतु सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा निषेध करणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्ही एक दिवसाचा संप पुकारला आहे. मात्र मुंबईतील जे.जे. रुग्णालय, केईएम, शीव, नायर व कूपर या रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या अधिक असते. अशा रुग्णालयांमधील सर्वच डॉक्टर संपामध्ये सहभागी झाल्यास रुग्ण सेवा बाधित होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन या महाविद्यालयांमधील काही निवासी डॉक्टरांमार्फत रुग्ण सेवा सुरू ठेवण्याचा तर काहींनी संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण सेवा सुरळीत असल्याची माहिती जे.जे. रुग्णालयातील ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. महेश तिडके यांनी दिला.