मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने ‘दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९’ मार्गिकेतील डोंगरी कारशेडच्या कामासाठी मागील काही दिवसांपासून वृक्षतोडीस सुरू केली आहे. मात्र ही वृक्षतोड बेकायदा असल्याचा आरोप डोंगरीवासिय आणि पर्यायवरणप्रेमींनी केला आहे. क्रमांक नसलेली झाडे कापण्यात येत आहेत. तर झाडांचे वय चुकीचे दाखवून त्यांची कत्तल केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांच्या सूचना – हरकतींच्या सुनावणीच्या अनुषंगाने शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नसताना वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली आहे. ही बेकायदा वृक्षतोड त्वरित थांबवावी आणि डोंगरी कारशेड रद्द करून इतरत्र हलवावी, अशी मागण डोंगरीवासियांकडून करण्यात येत आहे. याच मागणीसाठी रविवार, २९ जून रोजी डोंगरीवासियांनी एका रॅलीचे आयोजन केले आहे.

‘मेट्रो ९’ मार्गिकेच्या कारशेडसाठी १२ हजार ४०० झाडे बाधित होत आहेत. यापैकी काही झाडे कापण्यात येणार असून काही झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. डोंगरी आणि आसपासच्या गावातील गावकऱ्यांचा मात्र या कारशेडला सुरुवातीपासून विरोध आहे. मिरा – भाईंदरमध्ये सध्या एकच डोंगर शिल्लक आहे. हाच एकमेव प्राणवायूचा स्रोत आहे. एका डोंगरावर पालिकेने कचराभूमी बांधून पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे. आता एकमेव डोंगरही नष्ट केला जात आहे, असा आरोप करीत स्थानिकांनी या कारशेडला विरोध केला आहे. डोंगरीची कारशेड रद्द व्हावी यासाठी मागील कित्येक महिन्यांपासून स्थानिक आणि पर्यायवरणप्रेमी आंदोलन करीत आहेत. मात्र या आंदोलनाकडे काणाडोळा करीत डोंगरी कारशेडसाठी वृक्षतोडीस सुरुवात करण्यात आली आहे. या कामाला १७ जूनपासून सुरुवात करण्यात आली असून ही वृक्षतोड बेकायदा असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कंत्राटदार क्रमांक नसलेली झाडेही तोडत आहे. तर ४ ते ६ आयुर्मान दाखवून थेट १५ ते २० वर्षांची झाडेही कापली जात आहेत. अद्याप वृक्षतोडीसंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झालेला नाही. असे असताना वृक्षतोड केली जात आहे. त्यामुळे ही वृक्षतोड तात्काळ थांबवावी, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती डोंगरीतील माजी नगरसेविका शर्मिला गंडोली यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेकायदा वृक्षतोड त्वरित थांबवावी आणि तातडीने डोंगरी कारशेड रद्द करून निसर्गाचा ऱ्हास थांबवावा, या मागणीसाठी रविवार, २९ जून रोजी डोंगरी चर्च ते भूतबंगला पोलीस ठाण्यादरम्यान एक रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने स्थानिक रहिवासी सहभागी होतील. त्यानंतर राई, मुर्धा, मोर्वा गावापासून ते थेट डोंगरीपर्यंत मोठी रॅली काढण्यात येईल. या रॅलीचे नियोजन सुरू आहे. या आंदोलनानंतरही वृक्षतोड थांबली नाही आणि आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असेही गंडोली यांनी सांगितले.