गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेची लोकल सेवा विविध कारणांमुळे विलंबाने धावत असून मंगळवारीही त्याची पुनरावृत्ती झाली. मंगळवारी सकाळी ११.३० पासून कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत असल्याची घोषणा ठाणे आणि अन्य रेल्वे स्थानकांमध्ये करण्यात येत होती. परिणामी, लोकल सेवा विस्कळीत झाली आणि रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागली.

हेही वाचा- आता आणखी एका मेट्रो ‘कारशेड’चा मुद्दा चिघळणार? वाचा कोणती मेट्रो आणि वाद नक्की काय आहे ते…

अनेक प्रवाशांना मनस्ताप

कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल विलंबाने धावू लागल्या आणि प्रवाशांना लोकलसाठी स्थानकांवर प्रतीक्षा करावी लागत होती. परिणामी, स्थानकांमधील प्रवाशांची गर्दी हळूहळू वाढू लागली. विलंबाने धावणाऱ्या लोकलमधील प्रवासीही हैराण झाले होते. सध्या नवरात्रोत्सव सुरू असून लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. लोकल विलंबाने धावू लागल्यामुळे मंगळवारी अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, यासंदर्भात मध्य रेल्वे जनसंपर्क विभागाकडे विचारणा करण्यात आली. मात्र अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही.