मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) उभारत असलेल्या या स्मारकाचे आतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण होईल, असा दावा करण्यात येत आहे.

राज्य सरकारने दादरमधील इंदू मिलमधील ४.८४ हेक्टर जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या स्मारकाच्या उभारणीची जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१५ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र या भूमिपूजनानंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास २०१८ पर्यंत वाट पाहावी लागली. काही कारणांमुळे कंत्राटदारास कार्यादेश देण्यास विलंब झाला. परिणामी, स्मारकाचे काम सुरू होण्यासही विलंब झाला. या स्मारकाचे काम २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. एमएमआरडीएने आता स्मारकाच्या कामाला वेग दिला. स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे.

हेही वाचा… मुलुंडमध्ये प्रकल्पबाधितांसाठी घरे बांधण्यास भाजपच्या लोकप्रतिनिधिंचा विरोध; अन्य धर्मीय येतील या भीतीने प्रकल्पाला विरोध

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या स्मारकाचेआतापर्यंत ३५ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिली. स्मारकातील बांधकाम ५२ टक्के, वाहनतळाचे ९५ टक्के, प्रवेशद्वाराचे ८० टक्के, सभागृहाचे ७० टक्के, ग्रंथालयाचे ७५ टक्के, प्रेक्षागृहाचे ५५टक्के, स्मारक इमारतीचे ४५ टक्के असे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान १०८९.९५ कोटी रुपये खर्चाच्या या स्मारकाचे काम २०२४ मध्ये पूर्ण होईल, असेही या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पुतळ्याच्या कामास आता सुरूवात झाली असून ते पूर्ण होण्यास काहीसा काळ लागणार आहे. त्यामुळे हे स्मारक आता मे २०२६ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे.