मुंबई : डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना http://www.hbsu.ac.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करून २६ मेपर्यंत प्रवेश अर्ज दाखल करता येईल. त्यानंतर २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे यावर्षीपासून शिकाऊ उमेदवारी एकात्मिक पदवी अभ्यासक्रमांना (अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्रॅम – एइडीपी) सुरूवात करण्यात आली आहे. तसेच बी.ए., बी.कॉम. आणि बी. एस्सी. या पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच बी. एस्सी. (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग), बी.एस्सी. लक्झरी ब्रँड्स अँड रिटेल मॅनेजमेंट, सायबर फॉरेन्सिक आदी अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
विज्ञान संस्था, एलफिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स आदी शैक्षणिक संस्थांचे मिळून असलेल्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठात काळाची गरज ओळखून विविध भविष्यवेधी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. ‘एल्फिन्स्टन महाविद्यालयात’ बी.ए., बी.कॉम. आणि बी. एस्सी. या पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच बी. एस्सी. (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग), बी. एस्सी. (डेटा सायन्स आणि ॲनालिटिक्स), बी.एस्सी. (सायबर सुरक्षा आणि डिजिटल फॉरेन्सिक्स) या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. ‘सिडनहॅम महाविद्यालयात’ पारंपरिक बी.कॉम. अभ्यासक्रमासोबत बी.कॉम. (बँकिंग व फायनान्शियल अनॅलिटिक्स), बी.एस्सी. फायनान्स, बी.एस्सी. लक्झरी ब्रँड्स अँड रिटेल मॅनेजमेंट या नव्या अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे.
‘इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन्सिक सायन्स’ या संस्थेत बी.एस्सी. आणि एम.एस्सी. इन फॉरेन्सिक सायन्स हे अभ्यासक्रम आहेत. त्याशिवाय सायबर फॉरेन्सिक, डिजिटल गुन्हे आणि कायदे, उपयोजित गुन्हेविज्ञान, नवीन फौजदारी कायदे हे अभ्यासक्रम पदवी व पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर पदविका स्तरावर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. तसेच, ‘एइडीपी’ अभ्यासक्रमाअंतर्गत बी.एस्सी. फिनटेक, बी.एस्सी. स्मार्ट फायनान्स, ब्लॉकचेन आणि एआय इनोव्हेशन्स, बी.एस्सी. बिझनेस एआय असे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष कार्याचा अनुभव देतील.
दरम्यान, विज्ञान संस्थेत एम.एस्सी. (बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, डेटा सायन्स, पर्यावरणशास्त्र, गणित, सूक्ष्मजैवशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र) अशा अकरा विषयांमध्ये अभ्यासक्रम सुरू आहेत.
डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
• ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे : २६ मेपर्यंत
• पहिली गुणवत्ता यादी : २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता
• कागदपत्रांची पडताळणी व शुल्क भरून प्रवेश निश्चिती : २९ ते ३१ मे
• दुसरी गुणवत्ता यादी : २ जून रोजी सायंकाळी ५ वाजता
• कागदपत्रांची पडताळणी व शुल्क भरून प्रवेश निश्चिती : ३ ते ५ जून
• तिसरी गुणवत्ता यादी : ९ जून रोजी सायंकाळी ५ वाजता
• कागदपत्रांची पडताळणी व शुल्क भरून प्रवेश निश्चिती : १० ते १२ जून
• नियमित तासिकांना सुरूवात : १६ जून