मुंबई : विक्रोळी परिसरात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला विक्रोळी पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन लाख रुपये किमतीचे एमडी सापडले असून पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीप्रकरणी आरोपीला अटक केली.
मुंबईत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असून अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोठ्या प्रमाणात गस्त सुरू आहे. विक्रोळी परिसरात अशाच प्रकारे पोलीस मंगळवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी एक व्यक्ती परिसरात अमली पदार्थ विकण्यासाठी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तेथे सापळा रचला.
संशयास्पद फिरणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी हटकले असता, तो पोलिसांना पाहून अधिक वेगाने पुढे जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी काही अंतर पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले.
सर्फराज कुरेशी (३२) असे या आरोपीचे नाव असून पोलीसांना त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १० ग्रॅम एमडी सापडले. त्याची किमत दोन लाख रुपये आहे. पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.