मुंबई : पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करी होण्याच्या घटनेत झालेली वाढ चिंताजनक असल्याचे अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाच्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. २०२१ मध्ये अशा रीतीने तस्करीच्या फक्त तीन घटनांची नोंद झाली.  मात्र २०२४ मध्ये अशा १७९ घटनांची नोंद झाल्याचे अहवालात म्हटले आहे. सुरक्षा यंत्रणांना २०२४ मध्ये २८३ तर ॲागस्ट २०२५ पर्यंत १३७ ड्रोन्स पाडण्यात यश आले आहे. प्रामुख्याने चीनी बनावटीचे अत्याधुनिक ड्रोन्सचा वापर पाकिस्तानातील तस्कर करीत आहेत. कमी उंची वापरुन जीपीएसच्या सहाय्याने मध्यरात्री ड्रोनमार्फत अंमली पदार्थांची तस्करी केली जाते. त्यामुळे हौ ड्रोन्स रडारच्या कक्षेत येत नाहीत. या ड्रोन्समार्फत सुमारे नऊ किलोपर्यंत अंमली पदार्थांची तस्करी करता येते, असेही या अहवालात म्हटले आहे. पंजाबमधील अमृतसर, गुरुदासपूर, तरण तरण, फिरोजपूर या पाकिस्तान सीमेवरील गावांमध्ये ड्रोन तस्करीच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत तर राजस्थान येथे १५ तर जम्मू-काश्मीर येथे एका ड्रोन तस्करीची नोंद झाल्याचे अहवाल सांगतो. हेरॅाईन व अफू या अंमली पदार्थांची प्रामुख्याने तस्करी होते, असेही नमूद करण्यात आले आहे.

राज्यातही नाकेबंदी

अंमली पदार्थविरोधात कठोर मोहिम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर राज्यातील सर्वच प्रमुख शहरात जोरदार कारवाई सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे अंमली पदार्थ तस्करीतील म्होरके राज्याबाहेर पसार झाल्याचा पोलीस यंत्रणेचा दावा आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती हे प्रत्येक आठवड्याला जातीने या कारवाईचा आढावा घेत आहेत. याशिवाय प्रत्येक दिवशी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. ७ ॲागस्ट रोजी अदनान शेख याला ७६६ ग्रॅम मेफेड्रॅानसह (एमडी) वांद्रे युनिटने अटक केली. त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे सुधारीत विधेयक जुलैमध्ये पावसाळी अधिवेशनात मंजूर झाल्यानंतर पहिली कारवाई मुंबई पोलिसांकडून करण्यात आली.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनीही  १८ सप्टेंबर रोजी दीघा येथे अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या शांताबाई करंदेकर हिच्यासह सहा जणांच्या टोळीविरोधात मोक्का अन्वये कारवाई केली.

सध्या हायड्रो गांजा (विड) प्रामुख्याने उपलब्ध होत आहे. मलेशियातून हायड्रो गांजाची तस्करी होते. अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाने विमानतळावरील कारवाईत वाढ केल्याने मुंबई, ठाण्यात विड मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मणिपूरमधून हेरॅाईन राजस्थान वा मध्य प्रदेशमार्गे मीरा रोड, वसई-विरार, नालासोपारा परिसरात आणले जाते. तेथून ते मुंबईत पाठविले जाते. मुंबईला सध्या एमडीचा विळखा आहे. एमडी हा अमली पदार्थ खूपच घातक असून या विरोधात जोरदार कारवाई सुरु करण्यात आल्याचा दावा एका अधिकाऱ्याने केला. राज्यात पोली. कारवाईत आतापर्यंत दोनशे कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

अंमली पदार्थांविरोधात आपण आयुक्त झालो तेव्हापासून जोरदार कारवाई सुरु केली आहे. अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी पाचही प्रादेशिक विभागात असलेली युनिट कार्यालये सक्षम करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व गुन्ह्यांबाबत शून्य सहिष्णुता धोरण राबविण्यात येत आहे – देवेन भारती, मुंबई पोलीस आयुक्त