Threatens call to Mumbai Police: मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला अनेकदा धमक्याचे फोन येत असतात. सार्वजनिक स्थळ, सरकारी कार्यालय स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी दिली जाते. पोलीस तातडीने अशा सूचनांची दखल घेऊन खातरजमा करत असतात. बुधवारी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला असाच एक धमकीचा फोन आला. मात्र फोन करणाऱ्याने स्वतःची सांगितलेली ओळख चर्चेचा विषय ठरली. ठाण्यात राहणाऱ्या २८ वर्षीय खासगी सुरक्षा रक्षकाने कंट्रोल रूमला फोन करून आपण २६/११ हल्ल्याचा दहशतवादी अजमल आमीर कसाबचा भाऊ असल्याचे सांगितले.

सदर फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने चौकशी करत आरोपीला ताब्यात घेतले. टाइम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, आरोपीचे नाव पियुष शुक्ला असून जेव्हा त्याने फोन केला तेव्हा तो मद्याच्या अमलाखाली होता. तसेच आरोपीची मानसिक स्थिती अस्थिर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याला कायदेशी ताकीद देऊन सोडण्यात आले.

मद्याच्या अमलाखाली केला फोन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आला होता. पोलिसांनी मोबाइल नंबर ट्रेस केल्यानंतर तो मुलुंडमध्ये असल्याचे कळले. पोलिसांचे मुख्यालय उडवून देण्याची धमकी देण्यापूर्वी आरोपीने स्वतःचा उल्लेख अजमल कसाबचा भाऊ असल्याचे केला होता. पोलिसांना धमकी दिल्यानंतर त्याने फोन ठेवून दिला. यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करून तात्काळ चौकशी सुरू केली.

चौकशीदरम्यान कळले की, आरोपी शुक्ला हा ठाण्यात सुरक्षा रक्षकाची नोकरी करतो. रात्री पकडण्यासाठी तो मुलुंड रेल्वे स्थानकावर आला. मात्र मद्याच्या नशेत असल्यामुळे रेल्वे पोलिसांनी त्याला प्लॅटफॉर्मवरून हाकलून दिले. त्यानंतर सदर प्रकरणाची तक्रार करण्यासाठी त्याने कंट्रोल रूमला फोन केला. पण पोलिसांबरोबर बोलत असताना बाचाबाची झाल्यानंतर त्याने सदर धमकी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोटीस देऊन सोडून दिले

आरोपी शुक्लाने नशेच्या अमलाखाली धमकी दिली आणि त्याचा दहशत पसरविण्याचा कोणताही उद्देश नसल्यामुळे पोलिसांनी त्याला नोटीस देऊन सोडून दिले. मात्र आप्तकालीन क्रमाकांचा चुकीचा वापर करू नये, तसेच धमकीचे फोन करू नयेत, असेही आवाहन पोलिसांनी केले आहे. जर असा प्रकार केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पोलिसांनी दिला.