मुंबई : वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने म्हाडाने राज्यभरात सर्व विभागीय मंडळांच्या माध्यमातून दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे. यापैकी ५० हजार वृक्षलागवड मुंबईत म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून केली जाणार आहे. या निर्णयानुसार मुंबई, पुणे, कोकण मंडळाकडून वृक्षलागवडीस सुरुवात झाली आहे.
राज्यातील अत्यल्प, अल्प गटाला परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हाडाचे आहे. त्यानुसार राज्यभर म्हाडाकडून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करून सोडतीद्वारे त्यांचे वितरण केले जाते. आतापर्यंत लाखो कुटुंबाचे हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले आहे. त्याचवेळी सामाजिक बांधिलकी म्हणून म्हाडाकडून विविध उपक्रमही राबविले जातात. सामाजिक बांधिकीच्या नात्याने कर्करोग रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसाठी परळमध्ये काही घरे म्हाडाने दिली आहेत. तर आता नोकरदार महिला, विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्यात येत आहेत, वृद्धाश्रमही बांधण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. आता पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी म्हणून म्हाडाने राज्यभर दोन लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.
वनमहोत्सव सप्ताहानिमित्त म्हाडाने राज्यभर दोन लाख झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. वृक्षलागवडीला १ जुलैपासून सुरुवात करण्यात आली असून वृक्षारोपण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) ५० हजार झाडे लावण्यात येत आहेत. मुंबई मंडळ ५० हजार, तर कोकण मंडळ २५ हजार झाडे लावणार आहे. या दोन्ही मंडळाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या आवारात ही झाडे लावण्यात येणार आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि अमरावती विभागीय मंडळासाठी प्रत्येकी २५ हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य ठेवले आहे.
वृक्षलागवडीला सुरुवात झाल्यापासून नाशिक मंडळाने १५ हजार झाडे लावली आहेत. तर पुणे मंडळाने सोलापूर रे नगर गृहनिर्माण प्रकल्पात ९५०० झडांची लागवड केली आहे. इतर मंडळांकडूनही वृक्षलागवड सुरू असून लवकरच दोन लाख झाडांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या निर्देशानुसार दोन लाख झाडांच्या लागवडीचे उद्दिष्ट्य सर्व मंडळांना देण्यात आले आहे. वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भावी पिढ्यांसाठी निरोगी आणि समृद्ध पर्यावरणाची शाश्वती देण्याच्यादृष्टीने आम्ही हे पाऊल उचलल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले. दरम्यान, झाडे लावल्यानंतर त्यांच्या देखभालीकडेही म्हाडाकडून लक्ष दिले जाणार आहे.