मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने शिरढोण आणि खोणी येथील अभिन्यासातील सुपर मार्केटसाठी राखीव तीन भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या तीन भूखंडांच्या ई लिलावासाठीची संगणकीय पद्धतीने नोंदणी, अर्जस्वीकृती सुरू झाली आहे. इच्छुकांना ३० जूनपर्यंत अर्ज सादर करता येणार असून ८ जुलै रोजी प्रत्यक्षात ई लिलाव होणार आहे. या ई लिलावातून कोकण मंडळाला १९ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.

शिरढोण आणि खोणी अभिन्यासात कोकण मंडळाकडून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविला जात आहे. यातील काही घरे बांधून पूर्ण झाली असून त्याचा ताबाही दिला जात आहे. तर काही घरांचे काम सुरू आहे. येथील मोठ्या संख्येने पीएमएवायची घरे असून त्यांना प्रतिसाद मिळू शकलेला नाही. परिणामी, काही दिवसांपूर्वीच कोकण मंडळाकडून येथील घरांच्या किंमतीत कपात केली आहे. घरांच्या किमतीत कपात केल्यानंतर तरी येथील घरे विकली जातात का हे येत्या काळात समोर येईल. मात्र येथील घरांना प्रतिसाद मिळावा यासाठी कोकण मंडळाने येथे शाळा, सुपरमार्केटसह अन्य सुविधा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खोणी आणि शिरढोण येथील एकूण तीन भूखंडांचा ई लिलाव करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. शिरढोण येथे सुपरमार्केटसाठी दोन भूखंड राखीव आहेत. कोकण मंडळाने यातील एक भूखंड २३२२ चौरस मीटरचा असून या भूखंडाच्या ई लिलावासाठी ४ कोटी ९२ लाख रुपये बोली लावली आहे. तर दुसरा भूखंड २५२२ चौरस मीटरचा असून यासाठी ५ कोटी ३४ लाख रुपये बोली लावण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोणीत सुपरमार्केटच्या वापरासाठीचा एक भूखंड आहे. या भूखंडाचे क्षेत्रफळ ३०४० चौरस मीटर असून या भूखंडाच्या ई लिलावासाठी मंडळाने ८ कोटी ५० लाख रुपये बोली लावल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या आठवड्यापासून या ई लिलावासाठी नोंदणी, अर्जस्वीकृती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. व्यक्ती, संस्था कोणीही या ई लिलावात सहभागी होऊ शकणार आहे. त्यामुळे परवडणाऱ्या दरात सुपरमार्केट सुरू करण्यासाठी भूखंड खरेदी करण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध झाली आहे. दरम्यान, ३० जूनपर्यंत यासाठी अर्ज सादर करता येणार असून ८ जुलैला या तीन भूखंडांचा प्रत्यक्ष ई लिलाव होणार आहे. या ई लिलावाच्या माध्यमातून कोकण मंडळाला १९ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळण्याची शक्यता आहे.