मुंबई : मुंबईसह राज्यातील प्रवाशांना वाहतूक सेवेसाठी ई-बाईक टॅक्सीचा पर्याय खुला झाला आहे. राज्यात लवकरच ई-बाईक टॅक्सीला मंजुरी मिळणार असून, अधिकृतरित्या रस्त्यावर ई-बाईक टॅक्सी धावणार आहे. ॲग्रीगेटर कंपन्यांना वैध परवाना घेऊन, त्याला मंजुरी मिळवून, ई-बाईक टॅक्सी सुरू करता येणार आहे. महाराष्ट्रात नोंदणीकृत किमान ५० ई-बाईक टॅक्सींचा ताफा असलेल्यांनाच परवाना दिला जाणार आहे.
मुंबई महानगरात परवानगी नसतानाही ई-बाईक टॅक्सी खुलेआम धावत होती. यावेळी अनेक नियमांचे उल्लंघन केले जात होते. याबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्यानंतर खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २ जुलै रोजी मंत्रालय – दादरदरम्यान ई-बाईक टॅक्सी आरक्षित केली. त्यानंतर संबंधित ई-बाईक टॅक्सी तिथे आली. परंतु, राज्यात ई-बाईक टॅक्सीला परवानगी नसतानाही ही सेवा सुरू असल्याने संबंधित ॲग्रीगेटर कंपनीविरोधात कारवाई करण्याची सूचना परिवहन विभागाला करण्यात आली. मात्र, ४ जुलै रोजी ‘महाराष्ट्र ई-बाईक नियम, २०२५’ अधिसूचना काढण्यात आली. राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवा चालवण्यापूर्वी ॲग्रीगेटर कंपन्यांना वैध परवाना घेणे आवश्यक असल्याचे या अधिसूचनेत नमुद करण्यात आले आहे.
ॲग्रीगेटर कंपन्यांना कोणत्या बाबी पूर्ण करणे आवश्यक
– महाराष्ट्रात नोंदणीकृत किमान ५० ई-बाईक टॅक्सींचा ताफा असलेल्यांनाच परवाना दिला जाईल.
– अर्जदारांना एक लाख रुपयांचे परवाना शुल्क आणि पाच लाख रुपयांची सुरक्षा ठेव यासह सविस्तर अर्ज सादर करावा लागेल.
– अर्जात निगमन कागदपत्रे, जीएसटी आणि पॅन नोंदणी आणि ऑपरेशनल पायाभूत सुविधांचा पुरावा समाविष्ट असावा.
– इ-बाइक-टॅक्सी सेवा चालवण्याचा विचार करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, भागीदारी कंपनी किंवा कंपनीला राज्य किंवा प्रादेशिक वाहतूक अधिकाऱ्यांकडून परवाना घेणे आवश्यक आहे.
– परवाना पाच वर्षांसाठी वैध राहील. परवानाधारकांनी प्रत्येक वाहनासाठी योग्य देखभाल, विमा आणि योग्यता प्रमाणपत्र सुनिश्चित केले पाहिजे. सेवा कंत्राटी वाहने म्हणून चालवल्या पाहिजेत आणि प्रादेशिक परवाना मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.
प्रवाशांसाठी किमान २ लाखांचा विमा संरक्षण
ई-बाईक टॅक्सी आरक्षित करण्यापूर्वी किंवा प्रवास सुरू करण्यापूर्वी ॲप आणि इतर माध्यमांद्वारे भाडे स्पष्टपणे कळवणे अनिवार्य आहे. प्रादेशिक किंवा राज्य वाहतूक प्राधिकरणाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त भाडे आकारता येणार नाही. तसेच अपघाती मृत्यू झाल्यास चालक आणि प्रवाशासाठी किमान दोन लाख रुपयांचा विमा संरक्षण द्यावे लागेल. याव्यतिरिक्त, सर्व चालकांसाठी नियमित सुरक्षा प्रशिक्षण आणि वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य असणार आहे.
परिवहन आयुक्त काय म्हणाले…
राज्यात बाईक-टॅक्सी सेवा चालवण्यापूर्वी अॅग्रीगेटर कंपन्यांना वैध परवाना घेणे आवश्यक आहे. अॅग्रीगेटर कंपन्यांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर बाइक टॅक्सी सुरू होईल. ही प्रक्रिया त्वरित पार पडणार असून, राज्यभरात लवकरच बाइक टॅक्सी सुरू होईल. – विवेक भीमनवार, परिवहन आयुक्त