निवडणूक आयोगाला अमर्याद अधिकार असून आयोगाने ठरविले, तर ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागू शकतो किंवा त्यांच्यावर निवडणूक लढविण्यास बंदीची कारवाईही होऊ शकते. आयोगाच्या निर्णयावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असून मुंडेंच्या उत्तरानंतरही प्रकरण बंद करता येईल. मात्र आयोगाने स्वत:हून अशा प्रकारे कारवाई केल्याचे उदाहरण नसून आयोगाचे अधिकार, कायदेशीर तरतुदी या संदर्भात कायदेतज्ज्ञांमध्ये मतभिन्नता आहे. मुंडे अडकण्याची शक्यता खूपच कमी असली तरी दीर्घकाळ टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांच्या मते मुंडे यांनी स्वत:हून वक्तव्य केल्याने त्याचे महत्त्व अधिक असून ते पुरावा म्हणून वापरले जाऊ शकते. आयोगाला सादर केलेल्या खर्चाच्या विवरणपत्रात खोटी माहिती दिल्याने निवडणूक आयोग पुढील निवडणुकांसाठी बंदीची कारवाईही करू शकते. मात्र हे इतके सोपे नाही. त्यासाठी मुंडे यांचे उत्तर आल्यावर आयोग संबंधित मतदारसंघाचे तत्कालीन निर्वाचन अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल मागवेल. गरज भासल्यास अन्य कोणाला पुरावे सादर करायचे असतील, तर संधीही दिली जाऊ शकते.
निवडणूक याचिका सादर करण्यास कालमर्यादा आणि विजयी उमेदवाराने भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी याचिका करणाऱ्यावर असते. येथे निवडणूक अधिकाऱ्यांना ते काम करावे लागेल. मात्र आयोगाची कारवाई असल्याने त्याला कालमर्यादा नाही. रमेश प्रभू यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही हिंदूुत्वाच्या मुद्दय़ावर प्रचार केल्याबद्दल निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र उच्च व सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना उमेदवाराची निवडणूक रद्द केल्यावर आयोगाची कारवाई होती. आताही आयोगाला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल.
मुंडे यांनी केलेल्या निवडणूक खर्चाची आता तपासणी करण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने त्यांनी दिलेले हिशोब चुकीचे आहेत, असे म्हणता येणार नाही. ते चुकीचे असल्याचे पुरावे उपलब्ध झाल्याखेरीज नोटीस देणे संयुक्तिक वाटत नाही. निर्वाचन अधिकाऱ्यांनी किंवा कोणीही निवडणुकीच्या वेळी आक्षेप घेतलेला नाही. भारतीय राज्यघटनेतील कलम २० (३) नुसार कोणत्याही व्यक्तीला स्वत:विरुद्ध साक्ष देण्यास बळजबरी केली जाऊ शकत नाही. त्यांचे शपथेवरील लेखी निवेदन डावलून जाहीर समारंभातील वक्तव्यावरून नोटीस देणे चुकीचे आहे. उमेदवाराने निवडणुकीचा खर्चच दिला नाही, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते, असे मत अॅड. उदय वारुंजीकर यांनी मांडले.
ज्येष्ठ वकील अधिक शिरोडकर यांना मात्र आयोगाची नोटीस देण्याचे पाऊल कुचकामी ठरेल असे वाटते. निवडणुकीतील खर्चाची मर्यादा अवाजवी आहे, पैशांचा किती वापर होतो, या मुद्दय़ावर सार्वजनिक चर्चा घडविण्यासाठी व लोकांना मते देण्यास उद्युक्त करण्यासाठी मी आठ कोटी रुपये खर्च केल्याचा दावा केला, असे स्पष्टीकरण मुंडे यांनी केल्यास आयोगाला प्रकरण बंद करावे लागेल, असे सांगितले. निवडणूक खर्चाचा तपशील शपथपत्रावर निर्वाचन अधिकाऱ्याकडे सादर करावयाचा असतो. तो गृहीत धरला पाहिजे. कार्यक्रमातील वक्तव्य हे काही शपथेवरील निवेदन नाही. आयोगाने निवडणुकीनंतर किती वर्षांनी नोटीस द्यावी, याला काही कालमर्यादा आहे की नाही, असा सवालही अॅड. शिरोडकर यांनी केला.
गडकरींना नोटीस देणाऱ्या प्राप्तिकर विभागाची मुंडेंवर मात्र मेहेरनजर
विशेष प्रतिनिधी, मुंबई</strong>
भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना ‘पूर्ती’च्या निमित्ताने नोटीस देणाऱ्या प्राप्तिकर विभागाने ज्येष्ठ भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर मात्र अजून मेहेरनजर दाखविली आहे. या विभागाकडून मुंडेंच्या वक्तव्याची माहिती घेतली जात असून प्राप्तिकर विभागाने नोटीस दिल्यास मुंडेंची डोकेदुखी वाढणार आहे.
आपल्या खासदारकीच्या निवडणुकीत आठ कोटी रुपये खर्च केल्याचे वक्तव्य केल्याने मुंडे अडचणीत आले आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाने मुंडे यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी शनिवारी रात्री नोटीस बजावली. मात्र प्राप्तिकर विभाग अजून थंड आहे. गडकरींच्या पुन्हा पक्षाध्यक्ष होण्याच्या मार्गात प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमुळे अडथळे निर्माण झाले. ही निवडणूक पार पडल्यावर प्राप्तिकर विभागाने काहीच केले नाही. विवाह समारंभ, मोठे कार्यक्रम पाहून किंवा वृत्तपत्रांमधील बातम्यांच्या आधारे दखल घेणारा प्राप्तिकर विभागाने मात्र मुंडे यांच्याबाबत अजून कोणतीच पावले उचललेली नाहीत.
मुंडे यांनी निवडणुकीत मोठय़ा प्रमाणावर खर्च केला असल्यास त्यांनी त्या आर्थिक वर्षांच्या ताळेबंदात कशा प्रकारे हिशोब दाखविले, त्यांचे उत्पन्न किती होते, खर्च केलेली रक्कम उत्पन्नाच्या ज्ञात मार्गापेक्षा अन्य मार्गाने आली होती का, उमेदवारी अर्जासोबत संपत्तीचे विवरणपत्र काय दिले, आदी तपशील प्राप्तिकर विभागाकडून तपासले जाऊ शकतात. त्यामुळे या विभागाने चौकशी सुरू केल्यास मुंडेंना उत्तरे देताना अडचण होणार आहे.
दरम्यान, मुंडे यांनी निवडणूक आयोगाची नोटीस मिळाल्यावर कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू केली आहे.