मुंबई : बेस्टच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक तोंडावर असताना आता या निवडणूकीत आणखी एक नवे वळण आले आहे. पतपेढीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि सरचिटणीस यांना राज्य सरकारच्या सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडूनही नोटीस बजावण्यात आली आहे. सहकारातील अनियमिततेचा ठपका ठेवत या नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. पतसंस्थेतील सभासदाच्या तक्रारीवरून या नोटीसा पाठवण्यात आल्याचे नोटिशीत म्हटले आहे. पतपेढीवर बेस्ट कामगार सेनेची सत्ता असून या नोटीसा जाणीवपूर्वक दिल्या जात असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेने केला आहे.
दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची निवडणूक उद्या १८ ऑगस्टला होणार आहे. या निवडणूकीसाठी वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत ज्या पॅनलची सत्ता येते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. त्यामुळे या निवडणूकीला महत्व आहे. मुंबई महापालिकेत गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे तितका काळ बेस्ट उपक्रमातही शिवसेनेची सत्ता होती. त्यामुळे कामगारांच्या पतपेढीतही गेली नऊ वर्षे बेस्ट कामगार सेनेचेच पॅनेल होते. मात्र सहकार क्षेत्रातील या निवडणूकीत पक्षीय राजकारण नसल्याचा दावा सर्व बाजूंनी केलेला असला तरी पक्षीय राजकारणाला या निवडणूकीत ऊत आलेला आहे. एका बाजूला शिवसेना (ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनेल या निवडणूकीत उतरवले आहेत. तर ठाकरे बंधूंना आव्हान देण्यासाठी आमदार प्रविण दरेकर व प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे माजी आमदार किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांनी एकत्र येऊन सहकार समृध्दी पॅनलची निर्मिती केली आहे. त्यामुळे ही निवडणूक महायुती विरुद्ध ठाकरे बंधू अशी रंगणार आहे. निवडणूकीचा प्रचार रंगात आलेला असतानाच आता या पतपेढीचे संचालक मंडळ वादात सापडले आहे.
बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीच्या संचालक मंडळाला राज्य सरकारचा सहकार विभाग आणि मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पहिली नोटीस १३ ऑगस्ट रोजी विभागीय सह निबंधक, सहकारी संस्था यांनी दिली आहे. त्या नोटीसीत नमूद केले आहे की, “विवेकानंद घाग आणि राजेंद्र गोरे यांनी केलेल्या तक्रारीनुसार महाराष्ट्र सहकार विभागाच्या कलम ८९ अ अंतर्गत, उपनिबंधक राजेंद्र गायकवाड यांची २०२४-२५ या वर्षातील संस्थेच्या नोंदींच्या चौकशीसाठी तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जितेंद्र चव्हाण सहाय्य करतील आणि ते २९ ऑगस्टपर्यंत चौकशी अहवाल सादर करतील.”
२४ कोटींचा गैरव्यवहार ?
याशिवाय, क्रेडिट सोसायटीला आर्थिक गुन्हे शाखेकडूनही नोटीस देण्यात आली असून, घाग यांनी केलेल्या तक्रारीवरून सहकारी संस्थेमधील अंदाजे २४ कोटी रुपयांच्या कथित गैरव्यवहाराबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या निवडणूकीवर या चौकशीचे सावट आहे.
कामगार सेनेचे आरोप
दरम्यान, या नोटीसा राज्यातील सत्ताधारी पक्षाने जाणीवपूर्वक दिल्या असल्याचा आरोप बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केला आहे. आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे सत्ताधारी पक्षातील आमदार असून बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीसाठी त्यांनी हुकूमशाही, अधिकार वापरून दबाव आणला असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपला ही निवडणूक जिंकणे अशक्य झाले असून त्यामुळे पाच संघटना एकत्र येऊन ही निवडणूक लढवत आहेत. या निवडणूकीच्या प्रचारासाठी सदस्यांना प्रलोभनेही दिली जात असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे.