मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (एमएससीबी) कथित गैरव्यवहाराप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. यापूर्वी ईडीने याप्रकरणी बारामती ऍग्रो लि.च्या कन्नड सहकारी साखर कारखाना लिमिटेडच्या (कन्नड एसएसके साखर कारखाना) ५० कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली होती. तसेच रोहित पवार यांची गेल्यावर्षी चौकशीही करण्यात आली होती.

एमएससीबी कथित गैरव्यवहार प्रकरणात नुकतेच पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे ईडीतील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. ईडीच्या तपासानुसार, रोहित पवार यांच्या बारमती ॲग्रो आणि अन्य कंपन्यांनी संगनमत करून कथित एमएससीबी गैरव्यवहार प्रकरणात संशयास्पद व्यवहार करून तोट्यात गेलेले साखर कारखाने लिलावाद्वारे विकत घेतल्याचा आरोप आहे. त्यात कन्नड एसएसके गिरणी ही रोहित वापर यांच्या बारामती ॲग्रो प्रा. लि. कंपनीने ५० कोटी रुपयांना विकत घेतली होती. बारामती ॲग्रोने कन्नड एसएसके खरेदी करण्यासाठी लागलेल्या पैशांबाबत ईडी तपास करीत आहे.

ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, बारामती ॲग्रोने कन्नड एसएसकेसाठी बोली लावण्यासाठी हायटेकशी संगनमत केले आणि चुकीच्या पद्धतीने बोली जिंकण्यासाठी लिलाव प्रक्रियेत फेरफार केला, असा संशय आहे. याच उद्देशासाठी बारामती ॲग्रोने बोली प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आणि बारामती ॲग्रोपेक्षा कमी रकमेची बोली लावण्यासाठी काही रक्कम हायटेककडे हस्तांतरित केल्याचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, २२ ऑगस्ट, २०१९ ला १२० (ब), ४२०, ४६७, ४६८, ४७१ भादंवि सह भ्रष्टाचार विरोधी कायद्याच्या कलम १३ (१) (ब) व १३ (१) (क) नुसार एमएससीबी बँक प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांच्या अनुषंगाने ईडीने २६ ऑगस्ट, २०१९ रोजी याप्रकरणी पीएमएलएल कायद्यानुसार तपासाला सुरूवात केली होती. ईडीने २०२३ मध्ये आमदार रोहित पवार यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर, हे प्रकरण थंड झाले होते. ईडीने या कंपनीसह अन्य पाच कंपन्या, संबंधित व्यक्ती यांच्या मुंबई, पुणे, बारामती येथील सहा ठिकाणी ५ जानेवारी २०२४ रोजी छापे टाकले होते. त्यानंतर २४ जानेवारी २०२४ रोजी रोहित पवार यांना ईडीने चौकशीला बोलावले होते. त्यावेळी त्यांची सुमारे १२ तास चौकशी करण्यात आली होती. यापूर्वी एमएससीबी बँकेतील कथीत गैरव्यवहाराप्रकरणी ईडीन १२१ कोटी ४७ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. तसेच याप्रकरणात एक आरोपपत्र व दोन पुरवणी आरोपत्रही दाखल करण्यात आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेने मात्र याप्रकरणी तपास बंद केला होता.