मुंबई : जेट एअरवेजचे प्रवर्तक नरेश गोयल व इतर आरोपींविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नवीन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बुधवारी मुंबई व दिल्लीतील आठ ठिकाणी ईडीने छापे टाकले. त्यात गोयल यांच्या संबंधित ठिकाणांचाही समावेश आहे.गोयल यांच्यावर नवीन गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या माहितीला ईडीच्या अधिकाऱ्याने बुधवारी दुजोरा दिला. त्याप्रकरणी ही शोधमोहीम राबवण्यात आल्याचे त्याने सांगितले. मुंबई व दिल्ली येथील आठ ठिकाणी शोधमोहीम बुधवारी राबवण्यात आली. कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने ३ मेला गोयल यांच्यासह इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.
कॅनरा बँकेचे कर्जवसुली व कायदेशीर विभागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. संतोष यांनी २३ नोव्हेंबर २०२२ ला सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यात आरोपींनी फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे, फौजदारी विश्वासघात, गुन्हेगारी नियमभंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले होते. कॅनरा बँकेच्या कफ परेड येथील कॉर्पोरेट कार्यालयाद्वारे कर्ज सुविधा पुरवली होती. तक्रारीनुसार हा गुन्हा १ एप्रिल २००९ ते ५ जून २०१९ या काळात घडला. जेट एअरवेजचे खाते बँकेने ५ जून २०१९ मध्ये बुडीत घोषित केले होते. त्यानुसार ५३८ कोटी ६२ लाख रुपये बँकेला येणे बाकी असल्याने तेवढय़ा रकमेचे बँकेचे नुकसान झाले. याबाबत बँकेकडून पडताळणी करण्यात आली असता बँकेकडून देण्यात आलेला निधी इतर ठिकाणी वळवण्यात आल्याचे उघड झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अज्ञात सरकारी अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी आरोपींना मदत केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे.