मुंबई : एनआयआरएफ क्रमवारीमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील ११ शैक्षणिक संस्थांनी अव्वल शंभर संस्थांच्या यादीत स्थान मिळवले असले तरी त्यांच्या गतवर्षीच्या क्रमवारीत यंदा मोठी घसरण झाली आहे. मुंबईतील आयआयटी मुंबई, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट आणि पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठ वगळता अन्य आठ संस्थांच्या क्रमवारीत लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे राज्यातील उच्च शिक्षण संस्थांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

एनआयआरएफच्या सर्वोत्तम संस्थांच्या क्रमवारीत आयआयटी मुंबईने आपला गतवर्षीचा तिसरा क्रमांक कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. आयआयटी मुंबईने अभियांत्रिकी विभागात तिसरे स्थान, व्यवस्थापन विभागात १४ वे, संशोधन विभागात दुसरे आणि नवोपक्रम या श्रेणीत दुसरे स्थान मिळवले आहे. होमी भाभा होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने गतवर्षीच्या २७ व्या क्रमांकावरून यंदा २० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुण्यातील सिम्बॉयसिसने कामगिरीत सुधारणा केल्याने गतवर्षीच्या ५२ व्या क्रमांकावरून ४० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या तीन शैक्षणिक संस्थांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्यात यश आले असले तरी गतवर्षी सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये पहिल्या १०० मध्ये असलेल्या अन्य आठ संस्थांच्या कामगिरीमध्ये घट झाली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला आपल्या पहिल्या १०० मधील स्थानही टिकवणे शक्य झाले नाही.

शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गतवर्षी एनआयआरएफमध्ये सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांमध्ये ३७ वे स्थान पटकावले होते. मात्र यंदा त्यांची कामगिरी फारच सुमार झाली असून, विद्यापीठाची घसरण थेट ९१ व्या स्थानावर झाली आहे. तसेच पुण्यातील आयसर संस्थेच्या कामगिरीची घसरण ४२ व्या स्थानावर ५५ व्या स्थानावर झाली आहे. पुण्यातील डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाची क्रमवारीमध्ये ६३ व्या स्थानावरून ७१ स्थानापर्यंत घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे मुंबईतील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीची कामगिरी गतवर्षीच्या ५६ व्या स्थानावरून ६४ व्या स्थानापर्यंत खाली आली आहे. नरसी मोनजी मॅनेजमेंट संस्थेच्या क्रमवारीमध्येही घसरण झाली असून, गतवर्षीच्या ८४ व्या स्थानावरून ९५ स्थानावर घसरण झाली आहे. तसेच वर्ध्यातील दत्ता मेघे इन्स्टिट्यूटचा क्रमांक ७१ वरून ८४ पर्यंत घसरला आहे. नागपूरमधील विश्वेश्वरया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचा क्रमांक ७७ व्या स्थानावरून ८६ स्थानापर्यंत घसरला आहे.

टीस १०० च्या बाहेर

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये (टीस) मागील वर्षांमध्ये झालेले विद्यार्थी आंदोलन, शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न याचा परिणाम त्यांच्या क्रमवारीवर झाल्याचे दिसून येते. त्यामुळे टीसला यंदा एनआयआरएफच्या सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीमध्ये पहिल्या १०० मध्ये स्थान टिकवणे मुश्किल झाले. परिणामी टीसची घसरण ९८ व्या स्थानावरून थेट १४७ व्या स्थानावर झाली.

मुंबई विद्यापीठाची क्रमवारीत लक्षणीय सुधारणा

परीक्षेत गाेंधळ, गुणपत्रिकेत चुका, प्रश्नपत्रिकेत चुका, विद्यार्थ्यांच्या विविध तक्रारी, घटती विद्यार्थी संख्या अशा अनेक समस्यांचा सामना करत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या क्रमवारीमध्ये यंदा लक्षणीय सुधारणा झाली आहे. देशातील सर्वोत्तम १०० शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये मुंबई विद्यापीठाने स्थान मिळवले आहे. सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांच्या यादीत गतवर्षी १३२ व्या स्थानावर असलेल्या मुंबई विद्यापीठाने यंदा थेट ९२ वे स्थान पटकावले आहे. तर विद्यापीठ श्रेणीमध्ये ६१ व्या स्थानावरून ५४ व्या स्थानावर झेप घेतली आहे.

आयआयएम मुंबई व्यवस्थापन श्रेणीत सहाव्या स्थानावर

आयआयएम मुंबईने व्यवस्थापन क्रमवारीमध्ये आपले सहावे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. ही मान्यता जागतिक दर्जाचे व्यवस्थापन शिक्षण देण्यासाठी, प्रभावी संशोधन चालविण्यास आणि उद्योग आणि समाजाशी त्यांचे संबंध मजबूत करण्यासाठी आयआयएम मुंबईच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतिबिंबित करते. क्रमवारीमध्ये सहाव्या क्रमांकावर येण्याचा आनंद असून, ही कामगिरी आमच्या प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी यांच्या समर्पणाचे प्रतिबिंब असल्याचे आयआयएमचे प्रा. मनोज तिवारी यांनी सांगितले.