मुंबई : मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाने शिक्षकांना सातत्याने नवे विचार, नवे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईमध्ये ‘एज्युकॉन २०२५’ या विशेष परिषदेचे आयोजित केले आहे. या परिषदेत मुंबई आणि आसपासच्या विभागातील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षणतज्ज्ञ आणि नव्या पिढीचे मार्गदर्शक सहभागी होणार असून शिक्षणातील नवकल्पना, डिजिटल शिक्षण, मूल्याधारित शिक्षण आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० चा प्रभाव यावर सखोल चर्चा करणार आहेत.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० प्रभावी अंमलबजावणी, डिजिटल शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, विद्यार्थ्यांमध्ये मूल्यवर्धन आणि नैतिक शिक्षण, शिक्षकांचे मानसिक आरोग्य आणि सक्षमीकरण अशा मुद्यांवर या परिषदेमध्ये विविध सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ विविध राज्यांतील पुरस्कारप्राप्त शिक्षक, विविध विद्यापीठांचे अधिष्ठाता परिषदेतील विविध सत्रास मार्गदर्शन करणार आहेत.
नवी अध्यापन पद्धती, शैक्षणिक नेतृत्व आणि व्यवस्थापन, विद्यार्थ्यांशी संवाद कौशल्य व अन्य विषयांवर कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. शिक्षक-प्राध्यापक संवाद मंच, शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रांशी संपर्क अशा प्रकारच्या नेटवर्किंग संधी परिषदेच्या निमित्ताने शिक्षकांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती शिक्षण चळवळीतील युवा कार्यकर्ते डॉ. विशाल कडणे यांनी दिली.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांचे सत्र, कार्यशाळा, चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके, शिक्षकांसाठी प्रेरणादायी सत्र, पुरस्कार वितरण असे सदर परिषदेचे स्वरूप असणार आहे. तसेच एज्युकॉन २०२५ हे संमेलन शिक्षकांना नव्या दिशा देणारे ठरेल, असे शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी सांगितले. संमेलनाची अधिकृत नोंदणी २२ सप्टेंबरपासून सुरू होणार असून, इच्छुक शिक्षकांनी व्हाट्स अपच्या माध्यमातून मोबाइल क्रमांक ९५९४०२०८८८ वर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.