शैलजा तिवले

धोकादायक मातांचे वेळेत निदान आणि उपचार; प्रसूतीमधील संभाव्य धोक्याबाबत जनजागृती

गंभीर प्रकृती असलेल्या मातांचे वेळेत निदान आणि उपचार, उपनगरीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी अद्ययावत सुविधा, माता नोंदणीवरील भर आणि प्रसूतीमधील संभाव्य धोक्याबाबतची जनजागृती यामुळे गेल्या काही वर्षांत वाढलेला माता मृत्युदर आठ वर्षांनी पूर्ववत म्हणजेच १४४ वर आणण्यात मुंबई महापालिकेला यश आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०१७ मध्ये नोंदलेला १५३ माता मृत्युदर २०१८ मध्ये १४४ पर्यंत कमी झाला आहे. येत्या काळात हा दर आणखी कमी करण्याचे आव्हान पालिकेला पेलायचे आहे.

२०११ मध्ये मुंबईचा माता मृत्युदर १४३ होता. मात्र त्यानंतर वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी सेवासुविधा आणि स्थलांतरण इत्यादी कारणांमुळे यात उत्तरोत्तर वाढ होऊन २०१६ मध्ये तो २०० वर पोहचला. या वाढलेल्या मृत्युदराचे विश्लेषण केईएम रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाच्या डॉ. अनुराधा मोहपात्र आणि पालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाच्या तत्कालीन प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी शोधनिबंधामध्ये केले होते. त्यात पोषण पुनर्वसन केंद्रासह आरोग्य विभागातील अपुरे मनुष्यबळ, खासगी रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक काळजीचा अभाव, दुर्गम भागांतील मातांची नोंदणी इत्यादी आव्हानात्मक प्रश्न पालिकेसमोर असल्याचे यामध्ये मांडले होते. मात्र, २०१७ मध्ये पालिकेच्या माता मृत्युदराने सात वर्षांनी प्रथम घट झाली. २०१६ मधील २०० नोंदलेले माता मृत्युदर १५३ वर आला. त्यानंतर गेल्या वर्षीदेखील ही घट कायम असून तो आता १४४ वर आला आहे. दर एक लाख जिवंत बालकांमागे मृत झालेल्या महिलांचे प्रमाणानुसार माता मृत्युदर ठरविला जातो.

मुंबईत माता मृत्यूमध्ये मुंबईतील महिलांइतकेच बाहेरील महिलांचे प्रमाण जवळपास निम्म्याने आहे. ठाणे, डोबिंवली, वाशी, मुंबई महानगर परिसरातच मातेच्या आरोग्याची काळजी धोकादायक प्रसूती करण्याची सुविधा या बाबी उपलब्ध झाल्या तर माता मृत्युदरामध्ये अजून घट होण्याची शक्यता आहे. माता मृत्यूच्या घटना, त्यांची कारणे याबाबतच्या बैठकांचे नियोजन करून त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा केला जात असल्याचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी व्यक्त केले.

गेल्या वर्षी प्रथमच मुंबईबाहेरील माता मृत्यूची संख्या १०० च्या खाली गेली आहे. मुंबईमध्ये माता मृत्यूचे मुख्य कारण हे विविध प्रकारचा संसर्ग आणि प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव ही आहेत. त्यानंतर हेपेटाएटिस आणि क्षयरोग ही महत्त्वाची कारणे आहेत. अशक्तपणा हे देखील माता मृत्यूचे एक कारण आहे.

गर्भवती मातांच्या नोंदणीवर विशेष भर दिला गेल्याने रुग्णालयात प्रसूती होण्याचे प्रमाण वाढले आहे. यांच्या आरोग्याची सातत्याने देखरेख ठेवल्यानेही प्रसूती सुरळीत होण्यास नक्कीच फायदा होत आहे. सामाजिक संस्थाही रुग्णांना अडचणीच्या वेळेत योग्य मार्गदर्शन करत आहेत.

– डॉ. निरंजन मायदेव, स्त्री रोग विभागाचे प्रमुख, शीव रुग्णालय