मुंबई : मुंबईत मागील २४ तासांत ३५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सखलभागात पाणी साचले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेचे ५२५ पंप कार्यान्वित आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेतील आपत्कालीन कक्षाला भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही बुधवारी आपत्कालीन कक्षाला भेट देऊन पावसाचा आढावा घेतला.
मुंबईत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील आपात्कालीन कक्षाला भेट दिली. तत्पूर्वी मंगलप्रभात लोढा यांनीही आपत्कालीन कक्षाला भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदीची पाहणी केली, तसेच कुर्ला येथील क्रांतीनगर व विक्रोळी पार्कसाईट येथील दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली. एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबईत ६ मुख्य उदंचन केंद्र आणि १० लहान उदंचन केंद्र आणि ५२५ पंप कार्यरत आहेत. २४ तासांत ३५० मिलीमीटर पाऊस झाला. कमी वेळात जास्त पाऊस म्हणजे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने मुंबईतील सखलभागात पाणी साचले. दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे कायम स्वरुपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता शहर आणि उपनगरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढवावी लागले. यासाठी महापालिका नियोजन करीत आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मिठी नदीची पाण्याची पातळी ३.९ मीटरपर्यंत वाढली आहे, त्यामुळे कुर्ल्याच्या क्रांतीनगरमध्ये पाणी शिरले. येथील जवळपास ३५० नागरिकांना महापालिकेने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. या रहिवाशांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून तेथे वैद्यकीय अधिकारी उपस्थित आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मिठी नदीच्या पातळीत वाढ होत आहे. खबरदारी म्हणून नदी काठच्या रहिवाशांचे नजिकच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासन, पोलीस आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी सुमारे ४०० रहिवाशांचे स्थलांतर केले. त्यांची निवासाची, जेवणाची व्यवस्था महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आली आहे, असे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यावेळी सांगितले.