मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा आपला पाया असून तो अधिक मजबूत करण्यासाठी या निवडणुका जिंकाव्याच लागतील. कोण कोणाशी युती करते याकडे लक्ष देऊ नका तर ही निवडणूक महायुती म्हणून लढायची आहे. त्यासाठी कामाला लागा. आपापसातील मतभेद दूर ठेवा, पक्षाला गालबोट लागेल असे वक्तव्य किंवा कृती करु नका. पक्षाचे काम लोकांपर्यंच पोहोचवा असा कानमंत्र उपमुख्यमंत्री आणि शिवसेना(शिंदे) मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी रविवारी शाखाप्रमुखांना दिला.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आज पक्षाच्या शाखाप्रमुखांशी संवाद साधला. शिवसेनेत शाखाप्रमुखाना अनन्य साधारण महत्व असून शाखा हे न्यायदानाचे मंदिर आहे. तेथूनच लोकांची कामे केली जातात. त्यांच्याशी सतत संपर्क ठेवला जातो असे सांगून शिंदे यांनी येणाऱ्या महापालिका.जिल्हा परिषदांच्या निवडणुका ह्य कार्यकर्त्यांच्या निवडणुका असून या निवडणूका कोणत्याही परिस्थितीत जिंकाव्याच लागतील असे सांगितले.

कोण कोणाशी युती करत हे सोडून द्या. त्यांचे गणित आम्हाला माहित आहे असे ठाकरे बंधूना सुनावतांना ही निवडणूक महायुती म्हणून लढायची आहे. शिवसेना मजबूत कशी होईल याकडे लक्ष द्या. युतीत कही वक्तव्य करून गालबोट लागेल अस वागू नका. जागा मागताना आपण ती का मागतोय हे पटवून द्या. आणि ती जिंकू शकतो हा विश्वास पाहिजे. आपल्या प्रभागातील लोकांची माहिती हवी. आपण मुंबईसाठी केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवा अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हा दसरा मेळावा पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने म्हत्वाचा असून तो यशस्वी करण्यासाठी कामाला लागल्याचे आदेशही शिंदे यांनी दिले. महापालिका निवडणुकांमध्ये कोणाला किती जागा लढवण्यासाठी मिळणार हे महत्त्वाचे नसून मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा झेंडा फडकवणे हे आमचे ध्येय असल्याचे सांगत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचे शिंदे यांनी बैठकीनंतर माध्यमाना सांगितले.

शाखाप्रमुख हा परिसरातील प्रत्येक नागरिकांशी सातत्याने संपर्कात असतो. स्थानिक नागरिकांच्या अडीअडचणी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तो कायम अग्रेसर असतो. याच कारणामुळे तो शिवसेनेमध्ये महत्त्वाचा घटक आहे. शाखाप्रमुखांना निवडणुकीत काय काम करायचे हे सांगणे हे काय नवीन नाही. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यामुळे पक्षाचे सर्व शाखाप्रमुख आता सक्रीय झाले आहेत. ते फक्त निवडणुकांची वाट पाहत आहेत. निवडणुका कधीही येऊ देत मुंबई महापालिकेवर महायुतीचाच भगवा फडकवण्यासाठी सारे सज्ज झाले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. युतीमध्ये जागावाटपामध्ये योग्य तो मानसन्मान राखला जाईल. किती जागा लढवणार हे महत्त्वाचे नसून महायुतीचा झेंडा महापालिकेवर फडकवणे हे आमचे ध्येय असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट केले.