मुंबई : गेली तीन ते पाच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग रचनेचा मसुदा जाहीर होताच सत्ताधारी महायुतीमध्ये वादाला तोंड फुटले आहे. नगरविकास विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने बहुसदस्य प्रभागांची शिवसेनेला फायदेशीर रचना करण्यात आल्याचा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा आक्षेप आहे.

मुंबई वगळता अन्य २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग रचना आहे. मुंबईत २२७ प्रभाग कायम ठेवण्यात आल्याने प्रभागांच्या रचनेत फारसे बदल झालेले नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईत २३६ प्रभाग करण्यात आले होते. पण महायुती सत्तेत येताच पुन्हा २२७ प्रभाग संख्या कायम ठेवण्यात आली. प्रभागांची संख्या कायम ठेवण्यात आली असली तरी थोडे फेरफार झाले आहेत. पण अन्य महापालिकांप्रमाणे मुंबईतील प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झालेले नाहीत. ठाणे, नवी मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये प्रभागांच्या रचनेवरून वादाला तोंड फुटले आहे. नवी मुंबईत शिंदे यांच्यामुळे प्रभागांची रचना करताना शिवसेनेला अनुकूल अशी रचना करण्यात आली. त्यामुळे शिंदे यांचे पारंपरिक विरोधक व वनमंत्री गणेश नाईक संतापले आहेत. प्रभाग रचनेवरून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पुणे महापालिकेतील प्रभाग रचनेवरून अजित पवार गटाने भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार गटातच सामना होण्याचीच चिन्हे असून या दोन्ही महापालिकांची प्रभाग रचना अजित पवारांसाठी महत्त्वाची आहे. शिंदे आणि अजित पवार यांच्यात अजिबात समन्वय नसल्याने पवारांची कोंडी करण्याची संधी शिंदे सोडणार नाहीत. महायुतीतच प्रभाग रचनेवरून निर्माण झालेल्या वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तोडगा काढावा लागणार आहे.

पुणे महापालिकेच्या प्रभागरचनेत महायुतीचा धर्म पाळण्यात आलेला नाही. प्रभागरचनेत भाजपचे वर्चस्व आहे. आमच्या पदाधिकाऱ्यांचे प्रभाग वेड्यावाकड्या पद्धतीने तोडले आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. – सुभाष जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

भाजपने प्रभागरचना करताना आम्हाला विचारात घेतले नाही. लोकसभा-विधानसभा लढविताना आम्हाला बोलावण्यात आले होते, तसे महापालिकेच्या प्रभागरचनेबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. महायुती होईल की नाही माहिती नाही. पण, आम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. – नाना भानगिरे, पुणे शहराध्यक्ष, शिवसेना (शिंदे)

मुंबईत प्रभागांची संख्या २२७ कायम राहिल्याने सीमा फारशा बदललेल्या नाहीत. आमच्या सरकारने वाढीव लोकसंख्या गृहीत धरून प्रभागांची संख्या वाढविली होती. पण सत्ताबदल होताच महायुती सरकारने घाबरून पुन्हा प्रभागांची संख्या कायम ठेवली आहे. वास्तविक वाढीव लोकसंख्येच्या आधारे प्रभागांची संख्या वाढणे अपेक्षित होते. – आमदार अनिल परब, शिवसेना (ठाकरे)