मुंबई : मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां हे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बुधवारी रात्री सोडल्यानंतर तोवर शिवसेनेसोबत असलेले आणखी पाच आमदार गुरुवारी दिवसभरात गुवाहाटीला जाऊन शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. शिवसेनेच्या या आमदारांच्या पळापळीमुळे संशयाचे वातावरण तयार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना विधिमंडळ पक्षात कायदेशीर फूट पाडण्यासाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश आमदारांचे म्हणजेच पक्षाच्या ५५ पैकी ३७ आमदारांचे संख्याबळ एकनाथ शिंदे यांच्यापाशी झाले आहेत. शिवाय शिवसेनेचे ९ सहयोगी अपक्ष आमदारही एकनाथ शिंदे यांच्या गटात गेल्याने बंडातील आमदारांची एकूण संख्या ४६ झाली.

महाविकास आघाडीतून बाहेर पडणे आवश्यक असल्याचे कारण सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मंगळवारी बंडाचा झेंडा पुकारला. बुधवारपासून एकनाथ शिंदे यांच्या गटात जाऊन दाखल होणाऱ्या शिवसेना व अपक्ष आमदारांची संख्या वाढू लागली. मंगळवारी शिवसेनेसोबत असलेले आमदार हळूहळू गुवाहाटीला जाऊ लागले.

बुधवापर्यंत शिवसेनेसोबत असलेले व बंडखोर शिवसेना नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी व निदर्शने करणारे माहीममधील आमदार सदा सरवणकर हे शिंदे यांच्या गोटात दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. मंगळवारी हेच सरवणकर शिवसेना भवनाच्या बाहेर बंडखोरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आघाडीवर होते. अचानक त्यांनी बुधवारी भूमिका बदलली आणि गुवाहाटी गाठले. कृषीमंत्री दादा भुसे हे वर्षां निवासस्थानी बुधवारी बैठकीला उपस्थित होते.

गुरुवारी सकाळी हे शिंदे यांच्या गोटात सामील झाले. याशिवाय मुंबईतील मंगेश कुडाळकर, कोकणातील दीपक केसरकर, माजी वनमंत्री संजय राठोड हे आमदार गुरुवारी दिवसभरात एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले. या पाच शिवसेना आमदारांमुळे एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी असलेल्या शिवसेना आमदारांची संख्या ३७ वर पोहोचली. याशिवाय एकूण ९ अपक्ष आमदार सोबत असल्याची यादी एकनाथ शिंदे यांच्याकडून जाहीर करण्यात आली.

खबरदारी..

शिंदे यांना ३७ आमदारांचे पाठबळ लाभले असले तरी त्यांनी गुरुवारी दिवसभरात स्वतंत्र गट किंवा विधिमंडळ पक्षात फूट पडल्याबद्दलच राज्यपालांकडे पत्र सादर केले नव्हते. आणखी काही आमदार बरोबर येतील याची शिंदे हे वाट पाहात असावेत. ३७ हा काठावरचा आकडा आहे. एखादा आमदार फिरला वा कायदेशीर मुद्यांवर काही आमदार अपात्र ठरल्यास सर्वच आमदार अडचणीत येऊ शकतात. यामुळेच सारी खबरदारी घेण्यात येत असावी, अशी शक्यता वर्तविली जाते.

आमदाराचे ठाकरेंविरोधात पत्र

आम्ही गद्दार नाही, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पाईक आहोत. अन्याय होत असेल तेव्हा बंड करून उठा अशी शिकवण बाळासाहेबांनी दिली. महाविकास आघाडीतील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही ही भूमिका घेतली आहे. आम्ही तुम्हाला येऊन सांगायाचा प्रयत्न केला पण आमचे ऐकले गेले नाही. आम्हाला तासनतास वर्षांच्या दाराबाहेर उभे केले, अशा शब्दांत आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांना पत्र लिहून टीकास्त्र सोडले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde has support of two thirds mlas of shiv sena party zws
First published on: 24-06-2022 at 01:36 IST